Dhurandhar 2 Box Office Collection Day 4: ‘धुरंधर २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरू आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने पुन्हा एकदा एका दिवसात १०० कोटींहून अधिक कमाई करण्याचा विक्रम केला आहे. अवघ्या काही दिवसांतच हा चित्रपट आपल्या पहिल्या भागाचे रेकॉर्ड मोडीत काढण्याची शक्यता आताच्या आकडेवारीवरून दिसतेय.
धुरंधर २ ने चौथ्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. रविवारी या स्पाय ॲक्शन चित्रपटाने भारतात तब्बल ११४.८५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने भारतात एकूण ४५४.१२ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे आणि या चित्रपटाचे भारतातील ग्रॉस कलेक्शन ५४१.१२ कोटी रुपये झाले आहे. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, चित्रपटाने परदेशात १४९.३५ कोटींची कमाई केली. धुरंधर २ चे जगभरातील कलेक्शन ६९१.३२ कोटी रुपये झाले आहे.
धुरंधर २ चे ४ दिवसांचे कलेक्शन
‘धुरंधर २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केली आहे. गुरुवारी या चित्रपटाने १०२.५५ कोटी रुपयांचे कलेक्शन करत दमदार ओपनिंग केली. त्याआधी बुधवारी झालेल्या ‘पेड रिव्ह्यूज’मधून चित्रपटाने ४३ कोटी रुपये कमावले होते. शुक्रवारी चित्रपटाच्या कमाईत थोडी घट होऊन ती ८०.७२ कोटींवर आली होती. शनिवारी कमाईत सुमारे ४०% वाढ झाली आणि ती ११३ कोटींपर्यंत पोहोचली. रविवारीदेखील ही घोडदौड कायम राहिली आणि चित्रपटाने तब्बल ११४.८५ कोटींची कमाई केली. सलग दोन दिवस १०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट ठरला आहे. धुरंधरने जगभरात एकूण १,३०७.३५ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली होती. आता हा दुसरा भाग तो रेकॉर्ड मोडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
धुरंधर २ ने मोडला बाहुबली २ चा रेकॉर्ड
‘धुरंधर २’ ची सध्याची कमाई पाहता, हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या सुपरहिट चित्रपटांचे विक्रम मोडीत काढण्याची दाट शक्यता आहे. ‘बाहुबली २: द कन्क्लूजन’ (२०१७) पेक्षाही दमदार कामगिरी करत आहे. भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘बाहुबली २’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने पहिल्या शनिवारी ९० कोटी आणि रविवारी ९३ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘धुरंधर २’ ने या दोन्ही दिवशी १०० कोटींहून अधिक गल्ला जमवून नवा इतिहास रचला आहे.
धुरंधर २ जगात दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंडिंग
‘धुरंधर २’ केवळ भारतातील बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडत नाहीये, तर संपूर्ण जगात या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जगभरात ६९१ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. ‘कॉमस्कोर’च्या रिपोर्टनुसार, २० मार्चच्या वीकेंडला जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर आहे. रायन गॉसलिंगचा ‘प्रोजेक्ट हेल मेरी’ हा चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. धुरंधर २ ने हॉलीवूडच्या ‘हॉपर्स’, ‘रेडी ऑर नॉट २’ आणि ‘स्क्रीम ७’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
