Dhurandhar 2 Box Office Collection Day 6: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ हा चित्रपट १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झाला. सध्या जगभरात ‘धुरंधर २’ चीच चर्चा असून तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन मुख्य भूमिकेत आहेत. या स्पाय थ्रिलर चित्रपटाने आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
‘धुरंधर २’ चित्रपट प्रदर्शित होऊन ६ दिवस झाले आहेत. हा चित्रपट लवकरच जागतिक स्तरावर १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असं आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसतंय. कारण भारतीय बॉक्स ऑफिसवर याने फक्त ६ दिवसांत तब्बल ५५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
‘धुरंधर २’ च्या कमाईत मंगळवारी किंचित घट
‘धुरंधर २’ ने पहिला वीकेंड गाजवला. धमाकेदार कामगिरी केल्यानंतर, Weekdays मध्ये या कमाईत थोडी घट दिसून आली. मंगळवारी या चित्रपटाचे देशभरात २०,४१२ शो झाले. या चित्रपटाने भारतात तब्बल ५६.५५ कोटी रुपयांची कमाई केली. ‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, धुरंधर २ चे भारतातील एकूण कलेक्शन ६८७.४३ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटाने जगभरात ९१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.
आज गाठणार १,००० कोटींचा टप्पा
धुरंधर २ ने मंगलवारी हिंदी भाषेत ५२ कोटी, तेलुगू भाषेत ३.१० कोटी, तमिळमध्ये १.१० कोटी, कन्नडमध्ये २० लाख आणि मल्याळममध्ये १५ लाख रुपये कमावले. परदेशातही या चित्रपटाची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘कॉमस्कोर’च्या मते, ओपनिंग वीकेंडला जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट दुसऱ्या क्रमांकावर होता. ६ दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण जागतिक कलेक्शन ९१९ कोटी रुपयांवर पोहोचले असून, आज तो १००० कोटींचा टप्पा पार करेल.
या मोठ्या चित्रपटांना टाकलं मागे
जागतिक कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर २’ ने ‘कांतारा चॅप्टर १’ (८५२.३६ कोटी) आणि ‘स्त्री २’ (८५७.१५ कोटी) या चित्रपटांना मागे टाकलं आहे. यामुळे हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. जर सिनेमाचे कलेक्शन याच गतीने होत राहिले तर धुरंधर २ भारतात ‘स्त्री २’ (५९७.९९ कोटी) आणि ‘छावा’ (६०१.५४ कोटी) यांच्या कमाईचा रेकॉर्डही लवकरच मोडू शकतो.
