Dhurandhar 2 Movie Review By Riteish Deshmukh : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असलेला ‘धुरंधर २’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच इंडस्ट्रीतील कलाकारांकडूनही भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यानंही या चित्रपटाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या ‘बिग बॉस मराठी’ सीझन ६मुळे चर्चेत असलेल्या रितेशचा आगामी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा टीझरही नुकताच ‘धुरंधर २’बरोबर प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे तो अधिकच चर्चेत आला आहे. लवकरच १ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘धुरंधऱ २’बद्दल रितेश देशमुख काय म्हणाला?
रितेश देशमुख सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि यामार्फत तो त्याच्या कामासंदर्भातील अपडेट्स त्याच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. अनेकदा तो इतर कलाकार मित्रांच्या कलाकृतींचंही यामार्फत कौतुक करत असतो. अशातच आता ‘धुरंधर २’ पाहिल्यानंतर त्यानं इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली. ‘धुरंधर २’चं कौतुक करत त्यानं यामधून लिहिलंय की, “हा एक अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव होता. रणवीर सिंह, स्क्रीनवर तू अक्षरशः जादू केलीस. प्रत्येक फ्रेममध्ये तुझी उपस्थिती जाणवली आणि तू भावना खूप प्रभावीपणे व्यक्त केल्या.”
पुढे त्यानं राकेश बेदी यांच्या अभिनयाचं कौतुक करत म्हटलं, “सर, तुम्ही नेहमीप्रमाणे उत्कृष्ट काम केलं आहे.” इतर कलाकारांबद्दल बोलताना तो म्हणाला, “अर्जुन रामपाल, तुझं काम खूप प्रभावी आहे. संजय दत्त सर, स्क्रीनवरील तुमचा दबदबा जबरदस्त होता. सारा अर्जुन, तू खूप प्रतिभावान आहेस. तुझ्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.”
निर्मात्यांचेही अभिनंदन करत त्यानं जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांचं विशेष कौतुक केलं. तसंच दिग्दर्शक आदित्य धरबद्दल तो म्हणाला, “तुझं काम विलक्षण आहे. चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खास आहे.” यामी गौतम हिचंही अभिनंदन करत रितेशनं शेवटी आर. माधवन यांच्याबद्दल लिहिलं आहे.
आर. माधवनबद्दल तो म्हणाला, “तू अप्रतिम आहेस. प्रत्येक संवाद तू उत्कृष्टरीत्या सादर केला आहेस. ‘धुरंधर २’ला मिळत असलेल्या यशासाठी तुला मनापासून अभिनंदन.” एकूणच ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रेक्षकांसह सेलिब्रिटींकडूनही भरभरून कौतुक मिळवत असून, बॉक्स ऑफिसवर त्याची दमदार कामगिरी सुरूच आहे.

दरम्यान, धुरंधरच्या पहिल्या भागानंही जगभरात कोट्यवधींचा गल्ला जमवलेला आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात कौतुक झालं होतं. अशातच आता तो अपेक्षित प्रतिसाद ‘धुरंधर २’लाही मिळत आहे. चित्रपटानं सुरुवातीच्या तीन दिवसातच अनेक रेकॉर्ड मोडत कोट्यवधी रुपये कमावले. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार १९ मार्चला प्रदर्शित झालेल्या धुरंधर २नं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३५९.०९ कोटींचं कलेक्शन केलं आहे.
