Rajamouli Reviews Dhurandhar 2 : ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. प्रेक्षकांसह अनेक कलाकार मंडळीसुद्धा या चित्रपटाचं सोशल मीडियावरून कौतुक करत आहेत.

‘धुरंधर २’ची सुरुवात जबरदस्त झाली असून या चित्रपटानं ‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार आतापर्यंत जगभरात ३१४.४८ कोटींचं कलेक्शन केलं आहे. अशातच आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक राजामौली यांनीसुद्धा आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’चं कौतुक केलं आहे. राजामौली आदित्य धरच्या या चित्रपटाबद्दल नेमकं काय म्हणाले, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

राजामौली नेमकं काय म्हणाले?

एक्सवर ट्विट करत राजामौली रणवीर सिंहच्या ‘धुरंधर २’बद्दल म्हणाले, “मला धुरंधरचा पहिला भाग खूप आवडला, पण दुसरा भाग अजून चांगला आहे. लिखाण, कास्टिंग तांत्रिक गोष्टी, संगीत आणि वर्ल्ड डिझाईन, दिग्दर्शन या सर्व गोष्टी अप्रतिम आहेत, पण यातील भावनिक बाजूसुद्धा लक्ष वेधून घेते. उत्तम लिखाणामुळे चित्रपटातील ट्विस्टमुळे प्रेक्षकांची चिंता वाढते. आदित्य धर तू खूप छान काम केलं आहेस. चार तासांचा इतका मोठा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी आणि बनवण्यासाठी हिंमत लागते.”

Award Banner

‘धुरंधर २’मध्ये मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता रणवीर सिंहच्या कामाबद्दल राजामौली म्हणाले, “काय काम केलं आहेस तू, तू हमजा आणि जसकीरत या दोन्ही भूमिकांमधून उत्तम काम केलं आहे.” चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत असलेला अभिनेता आर. माधवनबद्दल दिग्दर्शक म्हणाले, “तू देशाविषयी असलेली चिंता इतक्या छानपणे साकारली आहेस की तुझा विजय आम्हाला आमचा विजय असल्यासारखा वाटला.” चित्रपटाला मिळत असलेल्या यशासाठी संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा!

राजामौली यांच्याबरोबर अभिनेता महेश बाबू, अल्लु अर्जुन, ज्युनियर एनटीआर यांसारख्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी कौतुक केलं आहे. बॉलीवूडमधून राकेश रोशन, वेदांग रायना या मंडळींनीही ‘धुरंधर २’चं कौतुक केलं आहे.

‘धुरंधर २’मध्ये रणवीर सिंह, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, संजय दत्त यांसारखे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला, तर आता या चित्रपटाचा सीक्वल पाहण्यासाठीसुद्धा प्रेक्षक चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.