Aditya Dhar’s Upcoming Movies After Dhurandhar 2 : बॉलीवूड दिग्दर्शक आदित्य धर सध्या त्याच्या ‘धुरंधर २’ चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे चर्चेत आहे. १९ मार्चला रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. ‘धुरंधर २’ने अनेक सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. अशातच आता येत्या काळातसुद्धा आदित्य धर काही बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे.
आदित्य धर गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या चित्रपटांमुळे प्रचंड चर्चेत आहे. २०२५च्या शेवटी डिसेंबरमध्ये ‘धुरंधर’ प्रदर्शित झाला. त्यातील पात्र, गाणी, संवाद सगळं सोशल मीडियावर अक्षरशः व्हायरल झालं आणि बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केली. त्यानंतर लगेचच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चित्रपटाचा सीक्वल ‘धुरंधर २’ रिलीज झाला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून हा चित्रपट सगळ्यांचं लक्ष वेधत आहे. भारतासह जगभरातही या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. अशातच आता ‘धुरंधर’मुळे प्रेक्षकांची दिग्दर्शक आदित्य धरकडून अपेक्षा वाढलेली असताना तो येत्या काळातही बिग बजेट चित्रपटांचं दिग्दर्शन करणार असून हे चित्रपट कोणते आहेत याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
आदित्य धर करणार तीन बिग बजेट चित्रपटांचं दिग्दर्शन
Variety Indiaच्या वृत्तानुसार आदित्य धर सध्या तीन बिग बजेट चित्रपटांवर काम करत आहे. यामध्ये ‘द इमोर्टल अश्वत्थामा’, एक ऐतिहासिक आणि एक स्पोर्ट्स ड्रामा यांचा समावेश आहे. आदित्य त्याचं ड्रीम प्रोजेक्ट ‘द इमोर्टल अश्वत्थामा’ ज्याचं काम बजेटच्या अडचणींमुळे थांबलं होतं त्यावर पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात आधी बॉलीवूड अभिनेता विकी कौशल झळकणार होता. पण, आता आदित्यला मोठ्या स्केलवर हा चित्रपट बनवायचं असल्याचं म्हटलं जात आहे.
रणवीर सिंहबरोबर पुन्हा काम करणार
आदित्य धर चंद्रगुप्त मोर्य यांच्या शासनकाळावर आधारित एक ऐतिहासिक महाकाव्य बनवणार आहे. ज्यासाठी तो खूप उत्सुक आहे. तर या चित्रपटात रणवीर सिंह झळकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा सुरू असून जर गोष्टी जुळून आल्या तर दोघे पुन्हा एकत्र काम करतील.
‘द इमोर्टल अश्वत्थामा’, चंद्रगुप्त मोर्य यांच्या शासनकाळावर आधारित ऐतिहासिक चित्रपटांसह आदित्य धर एक स्पोर्ट्स ड्रामासुद्धा बनवणार असल्याचं म्हटलं जात आहे. आदित्यला मोठ्या स्केलवर हा चित्रपट बनवायचा असून अद्याप त्याने चित्रपटाबद्दलची माहिती दिलेली नाहीये. पण, याबद्दल चर्चा सुरू आहे.
