Dhurandhar 2 fame actor: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर २’ची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामुपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, आर. माधवन, राकेश बेदी हे कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. रणवीर सिंह आणि इतर कलाकारांबरोबरच ७१ वर्षीय राकेश बेदींची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. त्यांच्यावर चाहत्यांकडून तर कौतुकाचा वर्षाव होत आहेच; पण त्याचबरोबर कलाकारही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

राकेश बेदींंनी ‘या’ मालिकांमध्ये केले आहे काम

‘धुरंधर’ व ‘धुरंधर २’मध्ये राकेश बेदींनी जमील जमाली ही भूमिका साकारली आहे. पण, राकेश बेदी यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत काम केले आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत राकेश बेदी महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. ते या मालिकेत तारक मेहताचा बॉस बाबूलाल या भूमिकेत दिसले होते. एका उद्योजकाची ही भूमिका होती. कडक शिस्तीचे बाबूलालचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेबद्दल बोलायचे तर ही मालिका १७ वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल-दयाबेनपासून ते तारक मेहता, टप्पू सेना, भिडेमास्तर, पोपटलाल अशी अनेक पात्रे गाजली आहेत. आजही ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत इतर मालिकांना टक्कर देताना दिसते.

राकेश बेदी यांनी तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेबरोबर इतर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. श्रीमान श्रीमती, ये जो है जिंदगी, तारा, कुबुल है, भाभीजी घर पर हैं, हम पाँच, जीने भी दो यारों अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

मालिकांबरोबरच राकेश बेदी यांनी अनेक चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. नसीब अपना अपना, जबाव हम देंगे, उरी : द सर्जिकल स्ट्राईक, जरा हटके जरा बचके, छत्रीवाले अशा अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, आतापर्यंत ‘धुरंधर २’ने भारतात एकूण ४५४.१२ कोटींची कमाई केली आहे. आता आगामी काळात हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.