Arjun Rampal’s Enrty In Rishabh Shetty Movie : ‘कांतारा’ या चित्रपटामुळे घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता ऋषभ शेट्टी लवकरच एका बिग बजेट चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरील एका चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात आता एका लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. कोण आहे तो अभिनेता? चला जाणून घेऊ…

ऋषभ शेट्टीच्या आगामी बहुचर्चित चित्रपटाचे नाव ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ असं आहे आणि यात अभिनेता ऋषभ स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. अशातच आता यात ‘धुरंधर’मधील एका अभिनेत्याची दमदार एन्ट्री झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

ऋषभ शेट्टीच्या चित्रपटात अर्जुन रामपालची एन्ट्री

व्हरायटी इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेता अर्जुन रामपाल ऋषभ शेट्टीच्या चित्रपटात दिसणार असून यात तो खलनायक साकारणार आहे. त्याच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती अजून आलेली नाही. पण अर्जुन रामपाल सध्या त्याच्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या सुपरहिट चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्यात त्याच्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ चित्रपटामधील एन्ट्रीचे वृत्त समोर आले आहे.

अर्जुन रामपाल लवकरच ‘या’ चित्रपटांत दिसणार

‘धुरंधर २’नंतर अर्जुन रामपाल इम्तियाज अली यांच्या ‘ओ साथी रे’ या नेटफ्लिक्सवरील रोमँटिक चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय त्याचे ‘३ मंकीज’, ‘पेंटहाउस’, ‘पंजाब 95’, ‘ब्लाइंड गेम’ आणि ‘बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ हे चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहेत. तसेच तो ऋषभ शेट्टीच्या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे आगामी काळात त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

दरम्यान, ऋषभ शेट्टीच्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप सिंह करत असून हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, युद्धनीती आणि संघर्ष दाखवले जाणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच, २१ जानेवारी २०२७ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ऋषभ शेट्टीच्या ‘द प्राईड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज’आधी रितेश देशमुखदेखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित बिग बजेट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, ज्याचे नाव आहे ‘राजा शिवाजी’. येत्या १ मे २०२६ पासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल. यात जिनिलीया देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, विद्या बालन अन् भाग्यश्रीसह अनेक कलाकार आहेत.