Dhurandhar 2 Rakesh Bedi Life Story : आदित्य धरचा ‘धुरंधर २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर नवनवीन रेकॉर्ड करत आहेत. रणवीर सिंह, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल यांसारख्या कलाकारांसह ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या भूमिकेनेसुद्धा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. राकेश बेदी यांच्या कामाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आणि विशेषतः त्यांच्या लग्नाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
राकेश बेदी हे इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेते असून त्यांनी चित्रपट, टेलिव्हिजन आणि नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘चष्मे बद्दूर’ चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर ‘श्रीमान श्रीमती’ व ‘ये जो है जिंदगी’ यांसारख्या मालिकांमुळे ते घराघरांत पोहोचवले. मनोरंजन विश्वात अत्यंत नम्र स्वभावाचे कलाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राकेश बेदी यांच्या यशस्वी करिअरमागे त्यांची पत्नी आराधना बेदी यांचा मोठा वाटा आहे.
राकेश आणि आराधना यांचे लव्ह मॅरेज नाही, तर ‘अरेंज मॅरेज’ पद्धतीने लग्न झाले होते. राकेश बेदी यांच्या मामी आणि आराधना यांच्या मावशी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या आणि त्यांनीच दोघांचे लग्न जमवले होते. जेव्हा राकेश पहिल्यांदा आराधना यांना भेटायला गेले, तेव्हा पहिल्याच नजरेत ते प्रेमात पडले. अशा प्रकारे त्यांचे ‘अरेंज मॅरेज’ हळूहळू प्रेमात बदलले.
सुरुवातीला आराधना यांच्या पालकांचा या लग्नाला विरोध होता. राकेश बेदी हे अभिनय क्षेत्रात होते आणि त्याकाळी हे क्षेत्र स्थिर मानले जात नसल्याने त्यांच्या करिअरबद्दल पालकांच्या मनात साशंकता होती. मात्र, कालांतराने त्यांनी या नात्याला संमती दिली आणि दोघांचे लग्न झाले.
राकेश आणि आराधना यांच्यात आयुष्यात अनेक चढ-उतार आले, पण त्यांनी कधीही एकमेकांची साथ सोडली नाही. दोघांनी एकत्र मिळून प्रत्येक संकटाचा सामना करायचा, हा एकमेकांना दिलेला शब्द त्यांनी आजही पाळला आहे.
राकेश आणि आराधना बेदी यांना रिधिमा आणि रितिका अशा दोन मुली आहेत. राकेश यांचे आपल्या दोन्ही मुलींशी खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. २०२२ मध्ये त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले, जो क्षण त्यांच्यासाठी अत्यंत भावूक होता. सध्या ‘धुरंधर २’मुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
