Dhurandhar 2 Fame Actor Video : रणवीर सिंहचा ‘धुरंधर’चा दुसरा भाग येण्यासाठी अवघे दोनच दिवस उरले आहेत. अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच चित्रपटातील एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याबद्दल अभिनेत्याने स्वत: व्हिडीओ शेअर करीत माहिती दिली आहे.
‘धुरंधर : द रिव्हेंज’च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक संवाद आहे. “हिंदू बहुत डरपोक कौम है… पडोस में रहते है हम गुद्दे भर का जोर लगाओ और बिगाड लो जो बिगाड सकते हो.” हा संवाद म्हणणाऱ्या अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. विवेक सिन्हा असे या अभिनेत्याचे नाव आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे.
विवेकने त्याच्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर करीत ‘धुरंधर २’मधील त्याच्या संवादाची रील बनवण्यास चाहत्यांना सांगितले होते. मात्र, या रीलमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत असून, कमेंटमध्ये जीवे मारण्याच्या धमक्याही येत आहेत.
“मी पाकिस्तानी नाही, मी उत्तर प्रदेशमधील बिजनौरचा…”
जीवे मारण्याच्या धमक्या येताच विवेकनं आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत त्यानं म्हटलं, “मी एक व्हिडीओ टाकला होता आणि ‘धुरंधर २’मधल्या डायलॉगवर रील बनवायला सांगितली होती. त्यावर तुमचा एवढा राग… लोकांच्या कमेंट्स वाचून लक्षात येतंय की, तुम्हाला माझा खूप राग आला आहे. कुणी म्हणतंय ‘तू दहशतवाद्यासारखा दिसतोस’, तर कुणी म्हणत आहे, ‘आम्ही तुला तिकडे येऊन मारू’. पण मला तुमचा हा देशाभिमान बघून अभिमान वाटला. आपल्यात जी देशभक्ती आहे, त्याला माझा सलाम. एकाने तर लिहिले, ‘मी पाकिस्तानात येऊन तुला मारीन’. पण मित्रा, मी पाकिस्तानी नाही. मी उत्तर प्रदेशातील बिजनौरचा आहे. सध्या मी मुंबईत राहतो. एका मुलीने तर ‘मला तुमचा अभिनय पाहून दोन शिव्या द्याव्या वाटत आहेत. तुमचा अभिनय इतका छान आहे’, अशी कमेंट केली आहे.”
हे सगळं बघून आणि वाचून मला खूपच आनंद झाला आहे. तुम्हा प्रेक्षकांचे हे प्रेम कायम राहू द्या. तसेच विवेकने व्हिडीओ शेअर करीत स्पष्टीकरण दिले, “मी फक्त पडद्यावर भूमिका साकारतो, प्रत्यक्ष आयुष्यात मी तसा नाही.”
‘धुरंधर २’ फेम विवेक सिन्हाने शेअर केलेला व्हिडीओ
दरम्यान, विवेक सिन्हाने वेब सीरिज व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ‘दिल्ली क्राइम सीजन ३’, ‘तांडव’ यांसारख्या वेब सीरिजमध्ये त्यानं अभिनय केला आहे. तसेच मनोज बाजपेयी यांच्या ‘एक ही बंदा काफी है’ या चित्रपटातही तो दिसला होता. अशातच ‘धुरंधर २’मधील नकारात्मक भूमिकेमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.
‘धुरंधर २’बद्दल सांगायचे झाल्यास, १९ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यात रणवीर सिंह, यामी गौतम व विकी कौशलच्या भूमिका असल्याच्या चर्चा आहेत. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमीळ, तेलगू, मल्याळम व कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
