Raj Arjun’s Emotional Post for Daughter Sara : ‘धुरंधर २’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १९ मार्चपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बऱ्याच दिवसांपासून याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात सारा अर्जुननं मुख्य नायिकेची भूमिका साकारली आहे. मुख्य अभिनेत्रीची भूमिका असलेल्या पहिल्या चित्रपटातूनच तिनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
सारा अर्जुन हिला तिचे वडील राज अर्जुन यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. राज अर्जुन यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. परंतु, सध्या ते त्यांच्या नव्हे तर त्यांच्या लेकीच्या कामामुळे चर्चेत आहेत. ‘धुरंधर’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यापासून सारा अर्जुन चर्चेत आहे. आपल्या लेकीला लोकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून अनेकदा ते सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. अशातच आता ‘धुरंदर २’ अखेर चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर त्यांनी लेकीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सारा अर्जुनचे वडील तिच्याबद्दल काय म्हणाले याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
साराबद्दल काय म्हणाले राज अर्जुन?
इन्स्टाग्रामवर लेक साराबरोबरचे फोटो शेअर करत अनेकदा ते व्यक्त होत असतात. अशातच आता ‘धुरंधर २’ रिलीज झाल्यानंतर राज अर्जुन यांनी साराबरोबरचा अजून एक फोटो शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून ते म्हणाले, “२००५ साली माझ्या आयुष्यात एक गोड व्यक्ती आली. मुलगी म्हणजे देवाची देण असते असं ऐकलं होतं आणि ते अनुभवलंसुद्धा. तिच्या जन्मानंतर मला आयुष्यातली पहिली मुख्य भूमिका मिळाली. तो चित्रपट अडकला, पण काहीतरी करण्याची जिद्द माझ्यात कायम राहिली. जर ती माझ्या आयुष्यात आली नसती, तर आज मी असा माणूस, कलाकार बनलो नसतो.”
राज अर्जुन यांनी सांगितला संघर्षकाळ
“दरवर्षी ती मोठी होत होती आणि मी संघर्ष करत होतो. पण, तिने फक्त माझा हात धरला नाही, तर माझं मनही समजून घेतलं. मी हार मानू शकलो नाही. त्या काळात भीती होती, पैशांचीही कमी होती, पण तिच्या डोळ्यातील आशेने मला खंबीर राहण्याची ताकद दिली, कारण तिला माझी गरज होती. ती माझी काळजी ‘धुरंधर’ सारखी घेत होती. तेव्हा मला कळलं की, आयुष्यात साथ देणारा माणूस नेहमीच ताकदवान असतो असं नाही.”
पुढे साराचे बाबा म्हणाले, “वडील होणं सोपं नसतं, कधी बाबा बनावं लागतं, कधी मित्र, तर कधी भाऊ. कधी तिच्या उंच भरारीसाठी वाऱ्यासारखी साथ द्यावी लागते. मी ते सगळं केलं आणि आशा सोडली नाही.” लेकीबद्दल कौतुक करत राज अर्जुन पुढे म्हणाले, “आज तीच मुलगी स्वतःच्या प्रकाशाने जग उजळवत आहे आणि मलाही त्यात सहभागी करत आहे. आधी मी तिची काळजी घेत होतो, आता ती माझी काळजी घेत आहे. लोक म्हणतात मुली वडिलांचा हात धरून पुढे जातात, पण मी माझ्या मुलीचा हात धरून माझं ध्येय गाठलं, याचा मला खूप अभिमान आहे; माझ्या आयुष्यातला हा उजेड म्हणजेच माझी सारा आहे.”
