Dhurandhar 2 The Revenge Review : हौसला इंधन बदला…! या तीन शब्दाभोवती फिरतो आदित्य धरचा ‘धुरंधर- द रिव्हेंज’ हा सिनेमा. कोणत्याही चित्रपटाचा दुसरा भाग चांगला नसतो… हा सिनेप्रेमींचा गैरसमज ‘धुरंधर २’ पाहून शंभर टक्के दूर होणार आहे. याचा रनटाइम तब्बल ३ तास ५५ मिनिटं आहे आणि यातील एकही मिनिट वाया जाणार नाहीये. कारण, प्रत्येक मिनिटाला तुम्हाला अनपेक्षित गोष्टी घडताना दिसतील. “Ladies and gentlemen, you are not ready for this” हे वाक्य आदित्य धरने खरं करून दाखवलं आहे.

तर, ‘धुरंधर २’ हा संपूर्ण सिनेमा एकूण सात भागात विभागण्यात आला आहे. यातील पहिल्या भागाचं नाव आहे ‘A Burnt Memory’. याच भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल जसकीरत सिंह रंगीचा भूतकाळ. तो अजय सान्याल यांच्या संपर्कात कसा येतो, कोणत्या कौटुंबिक गोष्टींचा परिणाम जसकीरतच्या संपूर्ण आयुष्यावर होतो…या भागात भारतीय न्यायव्यवस्थेवर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात. अखेर अजय सान्याल जसकीरतच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा दाखवतात…आणि हा मार्ग जसकीरत का स्वीकारतो, पंजाब ते पाकिस्तान हा प्रवास नेमका कसा झाला याची उत्तरं प्रेक्षकांना या भागात मिळतात.

दुसऱ्या भागाचं नाव आहे…’Lucifer’! जसकीरतचा हमजापर्यंतचा प्रवास पाहिल्यावर… दुसऱ्या भागात वर्तमानकाळात पुन्हा एकदा सिनेमा सुरू होतो. रहेमानच्या ( अक्षय खन्ना ) मृत्यूनंतर उझैर बलोचची भूमिका काय असते? अर्शद पप्पूला तो ल्यारीच्या रस्त्यावर ज्या क्रूरतेने मारतो, त्याचं मुंडकं कापून फुटबॉल खेळतो…हा संपूर्ण थरारक सीन आहे. यामध्ये प्रेक्षकांना कल्पनेपलीकडची हिंसा, क्रूरता पाहायला मिळेल. यानंतर हमजा उझैरला प्यादं बनवून कशी सत्ता आपल्या ताब्यात घेणार याचा संपूर्ण प्रवास आदित्य धरने खूपच रंजक पद्धतीने मांडला आहे.

यानंतर सुरू होतो ‘Ghosts from the Past’ म्हणजेच ‘धुरंधर २’ चा तिसरा भाग. या भागात ल्यारीमध्ये सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळतं. आता ल्यारीवर ज्याची सत्ता, तोच असतो कराचीचा बादशाह. अर्थात इलेक्शन जिंकल्यावर हमजा अली मजारी होतो कराचीचा नवीन बादशाह. याशिवाय त्याला ‘शेर-ए-बलोच’ ही पदवी बलोच वासीयांकडून देण्यात येते. याच भागात ‘बडे साहब’ नेमका कोण आहे? याची मिस्ट्री Solve झालेली आहे.

बडे साहब कोण आहे?

बडे साहब आहे दाऊद इब्राहिम. ही भूमिका नेमकी कोण साकारणार याची बरीच चर्चा सुरू होती. पण, प्रत्यक्ष पाहताना ते थ्रिल इतक्या प्रमाणात जाणवत नाही. कारण, दाऊदच्या भूमिकेपेक्षा इतर कलाकार भाव खाऊन जातात. ‘धुरंधर २’ मध्ये ही दाऊद इब्राहिमची भूमिका दानिश इकबालने साकारली आहे.

याचदरम्यान हमाजाच्या भूतकाळातील पंजाबमधील एक भारतीय व्यक्ती पुन्हा एकदा त्याच्यासमोर येणार आहे. हमजाने या व्यक्तीला बरोबर ओळखलंय. हा माणूस भारतातून ड्रग्जचा व्यापार करण्यासाठी पाकिस्तानात आलेला असतो आणि हमजा हाच जसकीरत आहे ही गोष्ट हा माणूस बरोबर ओळखतो… इथेच येईल मोठा ट्विस्ट आणि होईल मध्यांतर….या इंटरव्हल सीननंतर प्रेक्षक खऱ्या अर्थाने होतील Speechless. मध्यांतरापर्यंत अनेकदा कथा हळुवार पुढे जातेय…काहीही घडत नाहीये असं बऱ्याचदा वाटू शकतं. पण, दुसरा भाग तेवढाच पटापट पुढे सरकतो. त्यामुळे चार तास कुठेही कंटाळा येत नाही.

‘धुरंधर २’ चित्रपटाचा चौथा भाग आहे ‘Trial by Fire’ आणि पाचव्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळतील पाकिस्तानात दशतवाद्यांचे खून करणारे Unknown Men. या भागात नोटबंदी, जावेद खनानीचा मृत्यू हे मुख्य सीक्वेन्स पाहायला मिळतील. याशिवाय सहाव्या भागात हमजा घेणार आहे बदला The Revenge. यामध्ये मेजर इक्बाल वर्सेस हमजा असा आमनासामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल… आणि मग सुरू होतो The Final Chapter या सिनेमाचा अखेरचा भाग.

द रणवीर सिंह शो!

रणवीर अभिनेता आहे की जादूगार…हा प्रश्न प्रत्येकाला पडू शकतो. कारण, ३ तास ५५ मिनिटांचा हा सिनेमा रणवीरने अक्षरश: स्वत:च्या खांद्यावर उचलून धरलाय असं म्हणायला हरकत नाही. विशेषत: रणवीरचे डोळे तर डायलॉगपेक्षाही खूप काही बोलून गेलेत. संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन या सगळ्यांच्या भूमिका उत्तम आहेतच पण या सगळ्यात कौतुक करायला पाहिजे सारा अर्जुनचं.

यालिना ( सारा अर्जुन ) आणि हमजा ( रणवीर सिंह ) यांच्यातील इमोशनल रोमान्स खूप चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आला आहे. एक पाकिस्तानी मुलगी ते भारतीय एजंटची पत्नी हा धक्का पचवताना यालिनाची झालेली घालमेल, राग-अश्रू आणि हमजावर असलेलं प्रेम खूप काही सांगून जातं. एक छोटासा स्पॉयलर याठिकाणी नक्की देईन तो म्हणजे…दुसऱ्या भागात या यालिना आणि हमजाला एक मुलगा सुद्धा झालाय.

चार तासांचा रनटाइम ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण, यात कमाल करून जातं ते बॅकग्राऊंड म्युझिक. “बाजीगर ओ बाजीगर”, “ओये ओये” ही जुनी गाणी व्यवस्थित आणि लक्षात राहण्यासारखी प्लेस करण्यात आली आहेत. चित्रपटातील प्रत्येक सीन ‘रील’ नव्हे तर ‘रिअल’ वाटतोय…आणि याचं श्रेय जातं आदित्य धर याला. २००२ ते २००४ या काळात झालेलं हमजाचं ट्रेनिंग, त्याची पाकिस्तानमध्ये एन्ट्री, २६/११ चा हल्ला, २०१४ मध्ये भारतात झालेला सत्तापालट, नोटबंदी, Unkown Men या सगळ्याचं कनेक्शन रुपेरी पडद्यावर ल्यारी आणि हमजाशी जोडण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे.

रणवीर सिंहने कमाल अभिनय केलाय…त्याने प्रत्येक गोष्ट किती विचार करुन केलीये, याचा अंदाज चित्रपट पाहिल्यावर येईलच. शेवटच्या एका तासाच सगळी कोडी हळुहळू सुटत जातात. रणवीरचं कौतुक आहेच पण, ‘धुरंधर २’ पाहिल्यावर एक गोष्ट तुम्हाला निश्चितपणे लक्षात येईल ती म्हणजे, खरा ‘धुरंधर’ कोणी वेगळाच आहे. आता तो कोण याचा उलगडा थिएटरमध्ये होईलच…पण, हा क्लायमॅक्स ट्विस्ट पाहून प्रेक्षक सुद्धा चक्रावून जातील हे नक्की!