Dhurandhar 2 The Revenge Trailer : ‘धुरंधर- द रिव्हेंज’ अर्थात धुरंधरच्या दुसऱ्या भागाच्या ट्रेलरची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर दिग्दर्शक आदित्य धरने नुकताच ‘धुरंधर २’चा जबरदस्त ट्रेलर लॉन्च केला आहे. ट्रेलरमध्ये अनेक हिंट्स मिळतील असा प्रेक्षकांना अंदाज होता. पण, धुरंधरच्या टीमने मोठ्या हुशारीने या ट्रेलरमध्ये काहीच रिव्हिल केलेलं नाहीये. बडे साहब कोण असेल? अक्षय खन्ना दुसऱ्या भागात झळकणार की नाही यापैकी कोणत्याच प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ट्रेलर पाहून मिळणार नाहीयेत.

मात्र, तरीही हा ३ मिनिटं २५ सेकंदाचा ट्रेलर तुम्हाला पहिल्या सेकंदापासून ते शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. ट्रेलरची सुरुवात पहिल्या भागातील काही सीन्सने होते. यानंतर रहेमान डकैतचा मृत्यू झाल्यावर ‘ल्यारी’चा नवा बादशहा नेमका कोण होणार? याकडे लक्ष केंद्रीत केलं जातं. रहेमानच्या मृत्यूनंतर ल्यारीतील परिस्थिती पूर्णपणे बिघडते. खून, रक्तपात, दंगली होतात आणि शेवटी ल्यारीचा बादशहा हमजा अली मजारी होणार की रहेमानचा भाऊ उझैर बलोचकडे सत्ता जाणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

आता ल्यारीचा बादशहा कोण होणार हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होईल. पण, यानंतर एक खास वाक्य सर्वांचं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे…Introducing जसकीरत सिंग रंगी! हमजाची खरी ओळख…तो भारताचा गुप्तहेर म्हणून पाकिस्तानमध्ये वावरत असतो. आता जसकीरत सिंग रंगी नेमका कोण आहे, हमजाचा भूतकाळ काय होता? याचीही झलक प्रेक्षक या सिनेमात पाहायला मिळेल.

रणवीरचा खतरनाक अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. पहिला भाग प्रदर्शित झाल्यावर सर्वांनी अक्षय खन्नाचं भरभरून कौतुक केलं होतं. पण, दुसऱ्या भागात रणवीर सिंहला कोणीही दुर्लक्षित करु शकणार नाही अशा प्रतिक्रिया सध्या सिनेप्रेमींकडून येऊ लागल्या आहेत. संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर माधवन यांच्या भूमिकांनीही ट्रेलरमध्येच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण, बडे साहब नेमका कोण आहे याची कोणतीही हिंट या ट्रेलरमध्ये दिलेली आहे.

तिने वेधलं लक्ष…

‘धुरंधर २’च्या ट्रेलरमध्ये आणखी एक सीन चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे यालिना ( सारा अर्जुन ) एका व्यक्तीवर बंदूक रोखणार आहे. आता यालिना नेमकी कोणावर गोळी चालवणार? हमजाची खरी ओळख तिच्यासमोर उघड होणार की नाही? हमजाचा शेवट यालिना करणार की ती आपल्या नवऱ्याला साथ देणार असे बरेच प्रश्न हा सीन पाहून प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत.

दरम्यान, १९ मार्च २०२६ रोजी संपूर्ण जगभरात ‘धुरंधर २’ प्रदर्शित होईल. या सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धरने केलं असून ज्योती देशपांडे आणि लोकेश धर या सिनेमाचे निर्माते आहेत.