Dhurandhar 2 OTT : आदित्य धर दिग्दर्शित आणि अभिनेता रणवीर सिंह, अक्षय खन्ना स्टारर ‘धुरंधर’ सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ सिनेमा आजही मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवरदेखील सिनेमा पहिला जात आहे. अशातच सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा टीझर समोर आला आहे. 

‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जात आहे. हा चित्रपट मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या सिनेमाचा दुसरा भाग आहे. पहिला भाग (धुरंधर) बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने विक्रमी कमाई केली होती. त्यामुळे दुसरा भाग (धुरंधर २ : द रिव्हेंज) याहीपेक्षा मोठी कमाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Netflix ऐवजी JioHotstar वर होणार रिलीज ‘धुरंधर २’

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २ : द रिव्हेंज’च्या टीझरमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट १९ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर JioHotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. याशिवाय, Star Gold या टीव्ही चॅनलवरही चित्रपट प्रसारित केला जाणार आहे.

पहिला भाग ५ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आठ आठवड्यांनी, म्हणजेच ३० जानेवारीला Netflix वर रिलीज झाला होता.

Netflix वर प्रदर्शित होताच ‘धुरंधर’ने भारतासह पाकिस्तानमध्येही टॉप १० मध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र थिएटरमधील यशाच्या तुलनेत ओटीटीवरील प्रतिसाद काहीसा कमी होता. तसेच अनेक प्रेक्षकांनी स्क्रीन साइज, रंगसंगती (कलर ग्रेडिंग) आणि काही तांत्रिक अडचणींबाबत नाराजी व्यक्त केली होती.

‘धुरंधर २’ JioHotstar वर रिलीज होण्यामागची कारणं

‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ JioHotstar वर रिलीज केल्यामुळे तांत्रिक अडचणी दूर होतील आणि प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचा अधिक चांगला अनुभव मिळेल, अशी निर्मात्यांची अपेक्षा आहे.
तसेच पहिल्या भागाच्या यशामुळे आणि दुसऱ्या भागाबाबत असलेल्या प्रचंड उत्सुकतेमुळे JioHotstar ने डिजिटल हक्कांसाठी जास्त किंमत दिली असण्याचीही शक्यता आहे.

यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे JioHotstar, Star Gold आणि Jio Studios हे तिन्ही एकाच समूहाअंतर्गत येतात. पहिल्या भागाचा सुमारे ३०० कोटींचा बजेट लक्षात घेता, निर्मात्यांना सुरुवातीलाच मोठी रक्कम मिळणं गरजेचं होतं. त्यामुळे त्यावेळी सर्वाधिक बोली लावणाऱ्या Netflix ला डिजिटल हक्क विकण्यात आले होते.

‘धुरंधर २ : द रिव्हेंज’ हा चित्रपट भारतात हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटासाठी १९ मार्च ही तारीख निवडण्यात आली आहे, कारण याच काळात ईद, गुढीपाडवा यांसारखे सण येतात.

‘धुरंधर २’च्या ओटीटी रिलीजवर निर्मात्यांचं नियंत्रण

Jio Studios आणि JioHotstar यांच्यातील कराराच्या अटी जाहीर झालेल्या नसल्या, तरी डिजिटल हक्क एकाच समूहाकडे असल्यामुळे स्ट्रीमिंग कधी करायचं यावर निर्मात्यांचं अधिक नियंत्रण असण्याची शक्यता आहे. जर चित्रपट थिएटरमध्ये आठ आठवड्यांनंतरही चांगली कमाई करत राहिला, तर चित्रपटाचे ओटीटी रिलीज आणखी पुढे ढकलण्यात येऊ शकतं.