Dhurandhar 2 Trailer Postponed: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा सिनेमा ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन तासांहून अधिक कालावधीचा हा सिनेमा प्रचंड गाजला. फक्त भारतातच नाही, तर जगभरात या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
रणवीर सिंह, अक्षय खन्ना, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त, राकेश बेदी, असे अनेक कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.
अक्षय खन्नाच्या रेहमान डकैत या भूमिकेला खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. त्याचा अभिनय, प्रत्येक भावनेनुसार बदलणारे त्याचे हावभाव, त्याचा डान्स अशा अनेक गोष्टींमुळे अक्षय खन्नाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
‘धुरंधर २’चा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार?
‘धुरंधर’ने भारतात ८०० कोटींहून जास्त कमाई केली; तर जगभरात या चित्रपटाने १३५० कोटींची कमाई केली. ‘धुरंधर’ प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या निर्मात्यांनी ‘धुरंधर’चा दुसरा भाग येणार असल्याची घोषणा केली होती. सिनेमा १९ मार्च २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
मात्र, आता ‘धुरंधर २’च्या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. ‘धुरंधर’ सिनेमा पाहिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे काही दिवसांपासून ट्रेलरची चाहते वाट पाहत होते.
आज (६ मार्च २०२६) हा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची निर्मात्यांनी घोषणा केली होती. मात्र, आता रणवीर सिंहने ट्रेलर प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे सांगितले आहे. रणवीर सिंहने ”धुरंधर : द रिव्हेंज’चा ट्रेलर ७ मार्च २०२६ रोजी ११ वाजून १ मिनिटाला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले.
त्यावर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. “अजून एक दिवस वाट पाहावी लागणार”, “आता वादळ येणार आहे”, “आता पुन्हा फसवतील”, अशा अनेकविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
हा सिनेमा १९ मार्च रोजी पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तेलुगू, मल्याळम, कन्नड, तमीळ या भाषांमध्ये हा सिनेमा पाहता येणार आहे. आता ‘धुरंधर’प्रमाणेच त्याचा दुसरा भागही गाजणार का, चित्रपटात काही नवीन कलाकार दिसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
