Dhurandhar 2 Trailer Release : आदित्य धर दिग्दर्शित व रणवीर सिंह अभिनीत २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील अक्षय खन्नाचे सीन्स, डान्स स्टेप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये दुसऱ्या भागाबद्दल उत्सुकता होती. अशातच आता ‘धुरंधर २’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

२०२५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलीवूड चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सीक्वेलच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. खरं तर चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित होणार होता; पण काही कारणांमुळे त्याची तारीख बदलण्यात आली. आज अखेर ७ मार्च रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला असून, सोशल मीडियावर आता त्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ‘धुरंधर २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बॉलीवूडमधील कलाकारांनी त्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. आलिया भट्टनेही ‘धुरंधर२’बद्दल सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊयात…

‘धुरंधर २’चा ३.२६ मिनिटांचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये पुन्हा एकदा रणवीर सिंहचा डॅशिंग व खतरनाक असा अवतार पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन भारतीय गुप्तहेर हमजा अली याने रहमान डकैतला संपवल्यानंतर ल्यारीमध्ये काय घडतं याची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. ट्रेलरची सुरुवात “हिंदू बहुतही डरपोक कौम है”, या वाक्याने होते. ते ऐकून अजय संन्याल यांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याचं दिसत आहे. त्यानंतर ट्रेलरमधील एकामागोमाग एक ॲक्शन सीन्स लक्ष वेधून घेतात. ‘रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीचा बादशाह कोण होणार’ असा प्रश्न पाकिस्तानात निर्माण झाल्याचं यामधून दिसत आहे. ल्यारीमध्ये हमजा अली त्याची ताकद आणखी वाढवणार का आणि पुढे अजून काय काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे

आलिया भट्टची प्रतिक्रिया

‘धुरंधर २’चा हा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्ट हिनं रणवीर सिंह यानं शेअर केलेल्या ट्रेलरच्या पोस्टला लाईक करीत इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी तिनं “बिस्ट मोट ऑन हा ट्रेलर नियंत्रणाबाहेर आहे…” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यासह तिने चित्रपटातील सर्व कलाकारांना आणि दिग्दर्शकाला टॅग केलं आहे.

आलिया भट्टची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी ट्रेलरखाली कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. रणवीर सिंह व अक्षय खन्ना यांचा हा चित्रपट येत्या १९ मार्चला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.