Celebrity Trainer Mustafa Ahmed Talks About Bollywood Celebrities : बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच त्यांच्या फिटनेस, डाएट रूटीन यामुळे चर्चेत असतात. प्रत्येकाचा वेगळा डाएट प्लॅन, ट्रेनर कोच असतात. फिट आणि निरोगी राहण्यासाठी तसेच स्क्रीनवर आपण छान दिसावं यासाठी प्रत्येक कलाकार मेहनत घेत असतो. अशातच आता बॉलीवूडमधील सेलिब्रिटी ट्रेनरने इंडस्ट्रीतील काही कलाकारांच्या खाण्या-पिण्याच्या आवडी निवडींबद्दल सांगितलं आहे. 

अलीकडेच ‘धुरंधर २’मधील रिजवान या पात्रामुळे प्रसिद्धीझोतात आलेला मुस्तफा अहमद फक्त ट्रेनर नाहीये तर आता त्याने त्याच्या अभिनयानेसुद्धा अनेकांचं लक्ष वेधलं आहे. मुस्तफाने आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचा ट्रेनर म्हणून काम केलेलं आहे. अशातच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल विचारल्यानंतर त्याने विकी कौशल आणि हृतिक रोशन यांच्याबद्दल सांगितलं आहे. यावेळी तो नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

रणवीर सिंह आहे खवय्या

‘झूम’शी संवाद साधताना त्याला तू हृतिक रोशन, विकी कौशल आणि रणवीर  सिंह यांना ट्रेन केलं आहेस. तर यापैकीत कोणत्या अभिनेत्याला ट्रेन करणं सोपं होतं आणि कोणाला ट्रेन करणं कठीण होतं असं विचारल्यानंतर तो म्हणाला, “त्या सगळ्यांनाच ट्रेनिंग आवडतं. त्यामुळे तिघांनाही ट्रेन करणं सोपं होतं. खाण्यावर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मग रणवीर सिंहला थोडं कठीण जातं. मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मी त्याच्या टीमला त्याने काय खालं, काही ऑर्डर केलंय का त्याच्या रूममध्ये याबद्दल विचारत असतो. त्याला न्यूटेला खूप आवडतो. त्यामुळे अशा गोष्टींपासून दूर राहणं त्याला कठीण जातं. त्याला खायला खूप आवडतो. तो एक सिंधी मुलगा आहे त्यामुळे त्याला खायला इतकं आवडतं की त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जातं.”

हृतिक रोशन खातो १४ पोळ्या

यासह ‘जनसत्ता’च्या वृत्तानुसार मुस्तफाने एका मुलाखतीत हृतिक रोशन व विकी कौशल हे खूप खवय्ये असल्याचं सांगितलं आहे. मुस्तफा म्हणाला, “हे सगळे खूप खवय्ये आहेत. हृतिक रोशनपासून सगळेच सगळ्यांनाच खूप खायला आवडतं. मी त्याला १३-१४ घी लावलेल्या पोळ्या खातना पाहिलं आहे. त्याला खरंच खायला खूप आवडतं. त्याने तेव्हाच पोळ्या खाणं थांबवलं जेव्हा पोळ्या यायला उशीर होत होता.”

विकी कौशलचं मेटाबॉलिझम आहे कमाल

मुस्तफाने विकी कौशलच्या मेटाबॉलिझमबद्दल सागंतिलं आहे. तो म्हणाला की विकी कौशल वीटसुद्धा खाऊ शकतो. मुस्तफा अभिनेत्याबद्दल म्हणाला, “तो वीटही खाऊ शकतो आणि त्याला ती पचेलसुद्धा. तो काहीही खाऊ शकतो आणि ते पचवू शकतो. त्याचं मेटाबॉलिझम कमाल आहे.”