R. Madhavan Praises Akshaye Khanna : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान सुरू आहे. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळत असतानाच प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही चांगली दाद मिळत आहे. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या असल्या, तरी अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत विशेष चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचं खूपच कौतुक होत आहे. या चर्चेदरम्यान, चित्रपटात अजय सन्याल ही भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनने अक्षय खन्नाच्या कौतुकाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय खन्नाला मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे आर. माधवनला झाकोळले गेल्यासारखं वाटतं का? असं विचारण्यात आलं. याबद्दल बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवन म्हणाला, “असं अजिबातच नाही. अक्षयला मिळत असलेल्या प्रसिद्धी आणि यशामुळे मला खूप आनंद झाला आहे. त्याला जी प्रशंसा मिळते आहे, त्यासाठी तो पूर्णपणे पात्र आहे. मी त्याच्यासाठी आनंदी आहे.”
यापुढे आर. माधवननं अक्षय खन्नाचे कौतुक करत प्रसिद्धीपासून दूर राहणं ही त्याची खासियतच असल्याचं नमूद केलं. अक्षयच्या स्वभावाबद्दल बोलताना माधवन म्हणाला, “तो आता प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा फायदा घेऊन हजारो मुलाखती देऊ शकतो. पण तो सध्या आपल्या नव्या घरात शांततेचा आनंद घेत बसला आहे. शांतता ही त्याला नेहमीच आवडत आली आहे.”
स्वतःच्या प्रसिद्धीबद्दल आर. माधवन काय म्हणाला?
याच मुलाखतीत आर. माधवननं प्रसिद्धीबाबत स्वतःचं मतही मांडलं. याबद्दल तो म्हणाला, “मला वाटायचं की, प्रसिद्धीच्या बाबतीत मीच मागे मागे राहतो की काय… पण अक्षय खन्नाही तसाच आहे. त्याला या यश, प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा काहीही फरक पडत नाही. यश आणि अपयश त्याच्यासाठी सारखंच आहे.” यापुढे त्यानं ‘धुरंधर’सारख्या चित्रपटाशी आपलं नाव जोडलं जाणं ही त्याच्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचंही म्हटलं.
शेवटी माधवन म्हणाला की, अक्षय खन्ना आणि दिग्दर्शक आदित्य धर दोघेही चित्रपटाच्या यशाचा गवगवा करण्यात रस घेत नाहीत. “अक्षय असो किंवा दिग्दर्शक आदित्य धर, दोघांनाही या यशाचा फायदा उचलण्यात काहीच स्वारस्य नाही. ते फक्त त्यांचं काम चोख करतात.”
दरम्यान, ‘धुरंधर’ हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन, राकेश बेदी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. पुढच्या वर्षात सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असून त्याची सर्वजण वाट पाहत आहेत.
