Dhurandhar Actor Shares Shooting Experience : आदित्य धर दिग्दर्शित आणि रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘धुरंधर’ हा २०२५ मधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. विशेषतः अक्षय खन्नाने साकारलेली ‘रेहमान डकैत’ ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरली.
अशातच आज, १९ मार्च पासून ‘धुरंधर २’ प्रदर्शित झाला आहे. यानिमित्त चित्रपटातील अभिनेते रजत अरोरा आणि विक्रम भांब्री यांनी पहिल्या भागातील रेहमान डकैतच्या मृत्यूच्या सीनच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटात रजत अरोराने ‘मुक्का’, तर विक्रम भांब्रीने ‘शकील’ची भूमिका साकारली होती. हे दोघेही रहमान डकैतच्या गँगमधील महत्त्वाचे सदस्य होते.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रेहमान डकैतच्या मृत्यूचा सीन शूट करतानाचा अनुभव सांगताना रजत अरोरा म्हणाला, “मी दिग्दर्शक आदित्य सर यांना विचारलं होतं की, मी माझे कॉन्टॅक्ट लेन्स काढून टाकू का? कारण लेन्स लावून रडणं खूप कठीण असतं. मला एक अत्यंत भावनिक सीन करायचा होता.”
“तुमचे वडील वारले आहेत असं समजून…”
आदित्य धर यांनी कलाकारांना दिलेली सूचना सांगताना रजत पुढे म्हणाला, “आदित्य सरांनी आम्हाला सांगितलं होतं की, हा माणूस (रेहमान डकैत) तुमच्या टोळीचा प्रमुख असला तरी तो तुमच्यासाठी वडिलांसारखा आहे. जर तुमच्या स्वतःच्या वडिलांचा मृत्यू झाला, तर तुम्हाला कसं वाटेल? अगदी त्याच भावना आणि दुःख तुमच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. तुमचे वडील वारले आहेत असं समजूनच तुम्हाला या सीनमध्ये रडा.”
रजतने पुढे सांगितले की, “फ्रेममध्ये असलेल्या प्रत्येकाने आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख व्यक्त करावे, अशी आदित्य सरांची इच्छा होती. म्हणूनच त्या सीनमधील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.”
“सीनसाठी ग्लीसरीनचा वापर केला नाही”
नंतर अभिनेता विक्रम भांब्रीने सांगितले, “आम्हाला त्या दिवशीची स्क्रिप्ट (संहिता) सकाळीच मिळायची. स्क्रिप्ट वाचल्यावर आम्हाला समजलं की, आज ‘रेहमान डकैत’च्या मृत्यूचा सीन आहे. आम्हाला ओक्साबोक्शी रडायचं नव्हतं, तर शांतपणे ते दुःख व्यक्त करायचं होतं. विशेष म्हणजे, त्या सीनसाठी आम्ही ग्लीसरीनचा वापर केला नव्हता.”
रजतने पुढे सांगितलं की, ‘उजैर बलोच’ची भूमिका करणारे दानिश पंडोरकडूनही त्यांनी काही गोष्टी शिकल्या. “दानिश एखादा भावनिक सीन झाल्यावर १०-१५ मिनिटं त्याच झोनमध्ये राहायचा. सीन कट झाल्यानंतरही तो त्या भावनेतून लगेच बाहेर येत नसे. मी त्याच्याकडून हे शिकण्याचा प्रयत्न केला,” असं रजत म्हणाला.
दरम्यान, ‘धुरंधर’ चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. तोच प्रतिसाद आता सीक्वेललासुद्धा मिळताना दिसत आहे. ‘धुरंधर २’ने अॅडव्हान्स बुकिंगमधून सुमारे ८६.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला ‘A’ सर्टिफिकेट मिळाले असून एकूण ३ तास ५५ मिनिटांचा हा चित्रपट आहे.
