Dhurandhar box office collection day 47: ‘धुरंधर’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळजवळ दीड महिना झाला आहे. दीड महिन्यानंतरही या चित्रपटाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

बॉलीवूडचे लोकप्रिय पटकथा लेखक व गीतकार जावेद अख्तर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटाचे कौतुक केले. तसेच रणवीर सिंहच्या अभिनयाचेदेखील कौतुक केले. बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता करण जोहरनेदेखील चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. लोकप्रिय दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनीदेखील ‘धुरंधर’चे कौतुक केले होते.

चित्रपटसृष्टीतील फक्त याच व्यक्तींनी नाही, तर अनेक लोकप्रिय कलाकारांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्नापासून चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे.

प्रेक्षकांनीही ‘धुरंधर’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे; तर भारतीय चित्रपटांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे. बॉलीवूडमधील शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’, तसेच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ याबरोबकच विकी कौशलचा गाजलेला ‘छावा’ अशा अनेक चित्रपटांना मागे टाकत हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ने केली इतकी कमाई

अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करीत आहे. सुरुवातीच्या तुलनेत सध्या कमाई कमी होत असली तरीही हा चित्रपट दररोज काही कोटींची कमाई करीत आहे. आता ४७ व्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे, हे जाणून घेऊ…

मंगळवारी म्हणजेच ४७ व्या दिवशी या चित्रपटाने १.५० कोटींची कमाई केली. सोमवारीदेखील ‘धुरंधर’ने इतकीच कमाई केली होती. मंगळवारी कमाईत थोडी वाढ अपेक्षित होती. कारण- जिओ स्टुडिओने फक्त एका दिवसासाठी खास ऑफर जाहीर केली होती. चित्रपटाचे तिकीट १४९ रुपये इतके होते. मात्र, या ऑफरनंतरही कमाईत फार वाढ झालेली दिसली नाही.

जिओ स्टुडिओनुसार या चित्रपटाने भारतात आतापर्यंत ८८२.५० कोटींची एकूण कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने १३३८.५० कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, २३ जानेवारी ‘बॉर्डर २’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘बॉर्डर २’ प्रदर्शित झाल्यानंतर ‘धुरंधर’च्या कमाईवर आणखी परिणाम होऊ शकतो. आता आगामी काळात ‘धुरंधर’ ९०० कोटींचा टप्पा गाठू शकणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.