Dhurandhar Broke all records: रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दीड महिन्याहून अधिक काळ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर राज्य केले. ५ डिसेंबर २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाची प्रदर्शित होण्याआधीपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. प्रदर्शित झाल्यानंतर सुरुवातीला चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र त्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले. ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला; तर भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला.

धुरंधरने शाहरुख खानच्या ‘जवान’, ‘पठाण’, तसेच विकी कौशलचा गाजलेला ‘छावा’, याबरोबरच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री २’ या सर्व चित्रपटांना मागे टाकले आहे. आता हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

५६ दिवस हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर जगभरात थिएटरमध्ये पाहिला गेला. आता ५६ दिवसांत या चित्रपटाने किती कमाई केली हे तुम्हाला माहीत आहे का? भारतात ‘धुरंधर’ने ८९०.६७ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने १४२८ कोटींची कमाई केली आहे.

या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. ते कोणते आहेत, हे जाणून घेऊ…

१. सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट

‘धुरंधर’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने ॲटलीने दिग्दर्शित केलेल्या ‘जवान’ सिनेमाला कमाईच्या बाबतीत मागे टाकले. या चित्रपटाने ७६१.९८ कोटींची कमाई केली होती. ‘जवान’ हा सिनेमा २०२३ ला प्रदर्शित झाला होता.

२. सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ हा चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला होता. या चित्रपटाला मागे टाकत ‘धुरंधर’ हा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला. ‘पुष्पा २’ने ८१२.१४ कोटींची कमाई केली होती.

३. ८०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा एकमेव बॉलीवूड सिनेमा

या प्रक्रियेत ‘धुरंधर’ हा भारतात ८०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा एकमेव बॉलीवूड चित्रपट ठरला. चित्रपटाने ८९०.६७ कोटींची कमाई केली आहे.

४. दुसऱ्या ते सातव्या आठवड्यापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

‘धुरंधर’ हा असा भारतीय चित्रपट ठरला आहे की ज्याने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या आठवड्यात २५३.२५ कोटी रुपयांची कमाई केली, जी पहिल्या आठवड्यापेक्षा जास्त आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २०७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. इतकेच नाही तर तिसऱ्या आठवड्यात १७२ कोटी, चौथ्या आठवड्यात १०६.५० कोटी रुपये, पाचव्या आठवड्यात ५१.२५ कोटी, सहाव्या आठवड्यात २६.३५ कोटी आणि सातव्या आठवड्यात १३.९० कोटी रुपयांची कमाई केली.

५. सर्वाधिक कमाई करणारा चौथा भारतीय चित्रपट

‘धुरंधर’ने ‘आरआरआर’ला मागे टाकले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १,३८७ कोटींची कमाई केली होती. ‘धुरंधर’ हा चौथा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला.

याबरोबरच तो बॉक्स ऑफिसवर सलग २८ दिवस दुहेरी आकड्यांत कमाई करणारा एकमेव भारतीय चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट, असे अनेक रेकॉर्ड ‘धुरंधर’ने केले आहेत.

दरम्यान, ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.