Dhurandhar Box Office Collection Day 20: २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या काही चित्रपटांनी जसे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले, तसाच त्यांनी बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला. त्यामध्ये छावा, कांतारा : अ लिजेंड- चॅप्टर १ यांसह डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’चादेखील समावेश आहे.
धुरंधर हा सिनेमा ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता. आदित्य धरच्या या चित्रपटाची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. चित्रपटात दाखवलेली हिंसा, पात्रे आणि चित्रपटाची कथा या सगळ्यांबाबत बोलले जाऊ लागले. प्रेक्षकांचाही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
आता चित्रपटानं २० व्या दिवशी किती कमाई केली ते जाणून घेऊ…
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ने २० व्या दिवशी किती केली कमाई?
‘धुरंधर’ने २० व्या दिवशी १७.७५ कोटींची कमाई केली. चित्रपटाने भारतात एकूण ६०७ कोटींची कमाई केली आहे. त्यासह चित्रपटाने जगभरात ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ‘धुरंधर’ने जगभरात ९३५ कोटींची कमाई केली आहे.
हा चित्रपट रणवीर सिंगच्या करिअरमधील सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. इतकेच नाही, तर जगभरात ९०० कोटींचा टप्पा पार करणारा भारतीय सिनेसृष्टीतील ११ वा चित्रपट ठरला. गेल्या सहा दिवसांत या चित्रपटाने १५० कोटींची कमाई केली आहे.
इतकेच नाही, तर ‘धुरंधर’ने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. २०२५ च्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाला ‘धुरंधर’ने मागे टाकले आहे. ‘छावा’ने ६०१.५४ कोटींची कमाई केली होती. ‘छावा’मध्ये विकी कौशल, रश्मिका मंदाना व अक्षय खन्ना हे कलाकार प्रमुख भूमिकांत दिसले होते. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
याबरोबरच श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्त्री २’लादेखील मागे टाकले आहे. हा चित्रपट गाजला होता. सिनेमाने ५९७ कोटींची कमाई केली होती. आता ‘धुरंधर’ लवकरच ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा- अ लिजेंड-चॅप्टर १’ला मागे टाकेल, असा अंदाज केला जात आहे.
२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने जगभरात ९१५ कोटींची कमाई केली होती. ‘धुरंधर’ने रणबीर कपूरच्या या चित्रपटालाही मागे टाकले आहे.
दरम्यान, या चित्रपटात रणवीर सिंगसह अक्षय खन्ना, आर. माधवन, सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकांत आहेत. या चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्च २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.
