Dhurandhar The Revenge Director Aditya Dhar Post : गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते तो ‘धुरंधर २’ आता अवघ्या काही तासात संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘धुरंधर-द रिव्हेंज’ अधिकृतरित्या १९ मार्चला प्रदर्शित होईल. पण, १८ मार्चला सायंकाळी ५ वाजल्यापासून या सिनेमाचे पेड प्रिव्ह्यूज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ‘धुरंधर’ची चर्चा सुरू होईल.

‘धुरंधर-द रिव्हेंज’च्या प्रदर्शनाला अवघे काही तास बाकी राहिले असताना दिग्दर्शक आदित्य धरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत ‘धुरंधर’ फॅन्सना एक खास आवाहन केलं आहे.

आदित्य धर लिहितो, “हे पत्र माझ्या सगळ्या ‘धुरंधर’ प्रेमींसाठी आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी ‘धुरंधर’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सिनेमाने सर्वत्र जादू निर्माण केली. तुम्ही प्रेक्षकांनी आमचा सिनेमा फक्त पाहिला नाही…तर तो सिनेमा तुम्ही जगलात. भरभरून प्रेम दिलंत… ‘धुरंधर’मधील प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक पाहिलीत, अनेक छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या पटकन लक्षात आल्या…ज्या लक्षात येतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. अनेकांनी तर ‘धुरंधर’ दोन-तीन वेळा पाहिला. या सगळ्या प्रवासात आमचा चित्रपट कधी तुमचा होऊन गेला हे समजलंच नाही. आता ‘धुरंधर’ चित्रपट संपूर्ण देशाचा आणि जगाचा सुद्धा आहे.”

आदित्य पुढे सांगतो, “एखाद्या निर्मात्याला अजून काय हवं असतं…तुमचं हे प्रेम पाहून आम्ही भारावून गेलो होतो…त्यामुळेच ‘धुरंधर-द रिव्हेंज’साठी आमच्या टीमने अजून मेहनत घेतली. या नव्या सिनेमात तुम्हाला बऱ्याच नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील, आणि समोर येणारे थक्क ट्विस्ट पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. आम्ही ‘धुरंधर-द रिव्हेंज’साठी खूप मेहनत घेतलीये…या भागात येणारं प्रत्येक वळण, भावना, नवे ट्विस्ट पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल…तुम्ही थिएटरमध्ये हेच सगळं अनुभवाल अशी मला आशा आहे.”

“म्हणूनच आज मी तुम्हाला अत्यंत मनापासून आणि एक कळकळीची विनंती करतोय, प्लीज…या सिनेमाचे स्पॉइलर्स शेअर करू नका. कारण, प्रत्येक ‘धुरंधर’ चाहता हा सिनेमा पाहण्यासाठी थिएटरपर्यंत पोहोचला पाहिजे. मला आशा आहे की तुम्ही माझ्या विनंतीचं पालन कराल- तुमचाच आदित्य धर! भारत माता की जय!”

याशिवाय कॅप्शनमध्ये आदित्यने सर्वांना आणखी एक हिंट दिलीये. ती म्हणजे, “संपूर्ण पोस्ट क्रेडिट सीन नक्की पाहा, त्याशिवाय तुमची जागा सोडू नका.”

पहिल्या भागात क्रेडिट सीननंतर दुसऱ्या भागाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे आता दुसऱ्या भागाच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आदित्य धरने तिसऱ्या भागाची घोषणा तर केली नसेल ना? अशी उत्सुकता सध्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली आहे.