FA9LA Akshaye Khanna Viral Dance : ‘धुरंधर’ चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे; पण लोक अक्षय खन्नाच्या ‘रहमान डकैत’ या पात्राबद्दल सर्वांत जास्त प्रमाणात बोलताना दिसत आहेत. ‘रहमान डकैत’च्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाबरोरच चित्रपटाच्या एका सीनमधील त्याचं एन्ट्री साँगही सध्या खूप खूप चर्चेत आहे. हे व्हायरल गाणं नेमकं कसं तयार झालं, याबद्दल एका मुख्य अभिनेत्यानं सांगितलं आहे.
अक्षय खन्नाच्या ‘शेर ए बलूच’ गाण्यानं आणि त्यावरील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्सनं सर्वांनाच वेड लावलं आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर कमाल केली आहे. हे गाणं सर्वांनाच आवडलं आहे आणि लोक त्याच्या स्टेप्स करून रील्स बनवीत आहेत. या व्हायरल गाण्याबद्दल ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाच्या धाकट्या भावाची (उजैर बलोच) भूमिका साकारणाऱ्या दानिशनं चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे. तसेच या व्हायरल गाण्याबद्दलही तो बोलला.
FA9LA गाण्याच्या शूटिंगबद्दल बोलताना दानिश म्हणाला, “हे गाणं शूट करताना आम्हाला अजिबात अपेक्षा नव्हती की, याला लोकांचा इतका जबरदस्त प्रतिसाद मिळेल. अक्षयसरांनी जेव्हा कॅमेऱ्यासमोर डान्स केला होता, तेव्हाच ते खूप सुंदर झालं होतं. या गाण्यावरील सगळ्या डान्स स्टेप्स त्याला तेव्हाच तत्काळ सुचल्या होत्या.”
पुढे तो म्हणाला, “या गाण्याच्या संपूर्ण सीक्वेन्सची कोरिओग्राफी विजय गांगुली करीत होते; पण हा डान्स प्रत्यक्षात प्लॅनच नव्हता. बाकीचे डान्सर्स रिहर्सल करीत होते आणि आम्ही सर्व जण बसून सीनबद्दल चर्चा करीत होतो. तेव्हा अक्षयसरांनी ‘मी नाचू का?’ असं विचारलं आणि शॉट सुरू होताच त्यांनी जे सादर केलं, ते पाहून सगळे टाळ्या वाजवू लागले आणि आता हा डान्स व्हायरल होत आहे.”
‘धुरंधर’मधल्या या गाण्याचं मूळ नाव FA9LA असं आहे. FA9LA हे बहरेन अरबी भाषेतील एक वाक्य आहे, ज्याचा अर्थ ‘फन टाइम’ किंवा ‘पार्टी’ असा आहे. FA9LA हे गाणं Flipperachi चं आहे. हे गाणं सध्या ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आलं असलं तरी हे एक वर्ष जुनं गाणं आहे. Flipperachi च्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं जून २०२४ मध्ये अपलोड करण्यात आलं होतं.
