Dhurandhar Actor Arrest : २०२५ वर्षाच्या शेवटी ‘धुरंधर’ या सिनेमाची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. या ‘धुरंधर’ची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. अशातच ‘धुरंधर’ सिनेमातील एका अभिनेत्याला पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त समोर येत आहे. अभिनेता पोलिसांच्या ताब्यात असून, त्याची चौकशी सुरू आहे.

‘धुरंधर’ चित्रपटात रहमान डकैतचा स्वयंपाकी अखलाकची भूमिका करणाऱ्या नदीम खान या अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला गेला आहे. घरात काम करणाऱ्या महिलेने त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करीत त्याला अटक केली.

तक्रार करणाऱ्या महिलेचा आरोप आहे की, नदीम खानने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तब्बल १० वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ‘मिड-डे’च्या वृत्तानुसार, तक्रारदार महिला ४१ वर्षांची असून, नदीम खानकडे काम करण्यापूर्वी ती इतर अनेक कलाकारांच्या घरी घरकाम करत होती.

पीडित महिलेचे नदीम खानवरील आरोप

पोलिसांना दिलेल्या जबाबात तक्रारदार महिलेने सांगितले की, २०१५ साली तिची नदीम खानशी ओळख झाली. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली. आरोपीने तिला लग्न करण्याचे आश्वासन देऊन, तिचा विश्वास मिळवला आणि त्या विश्वासाच्या आधारावर त्याने तिच्या घरी तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

महिलेचे म्हणणे आहे की, १० वर्षांपासून ती आणि नदीम खान एकत्र होते. लग्न होईल या आशेवर तिने त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास संमती दिली. मात्र, नंतर खानने लग्नास नकार दिल्यानंतर तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात संपर्क साधून जानेवारीच्या सुरुवातीला तक्रार दाखल केली. तिने असेही सांगितले की, दोघांची भेट तिच्या घरी, तसेच वर्सोवा येथील नदीम खानच्या घरी होत होती.

याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने ‘मिड-डे’ला सांगितले की, पहिल्यांदा कथित शारीरिक संबंध मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तक्रारदार महिलेच्या घरी झाले होते आणि ती त्याच परिसरात राहते. त्यामुळे वर्सोवा पोलिसांनी हे प्रकरण मालवणी पोलिसांकडे वर्ग केले.