Dhurandhar Fame Actor Married His Student : एकत्र काम करता करता कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडताना आणि पुढे संसार थाटताना आपण पाहिले आहेत. पण, बॉलीवूडमधील या अभिनेत्याने त्याच्या विद्यार्थिनीबरोबर संसार थाटला. हा अभिनेता म्हणजे प्रेक्षकांचा लाडका मॅडी ऊर्फ आर. माधवन. त्याची लव्हस्टोरीसुद्धा खूप खास आहे.

आर. माधवनने आतापर्यंत त्याच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांत काम करत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आर. माधवन शिक्षक म्हणून काम करायचा आणि त्यादरम्यानच तो त्याच्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला आणि लग्नापूर्वी दोघांनी आठ वर्ष एकमेकांना डेट केलं. आर. माधवनचा शिक्षक ते अभिनेता हा प्रवास आणि त्याची प्रेमकहाणी कशी आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

‘अशी’ झालेली आर.माधवन व सरिता बिर्जे यांची भेट

‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार मूळचा झारखंडचा असलेला आर. माधवनने इंडस्ट्रीत पदार्पण करण्यापूर्वी शिक्षकाची नोकरी केली आहे. त्याने इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो सैन्य दलात जाणार होता, पण आई-वडिलांच्या सांगण्यानुसार त्याने विद्यार्थांना स्कील मॅनेजमेंटचं प्रशिक्षण दिलं. कोल्हापुरातच हे काम करत असताना त्याची भेट सरिता बिर्जेबरोबर झाली. ज्यांच्याबरोबर त्याने पुढे जाऊन लग्न केलं. सरिता यांना फ्लाइट अटेंडेंट बनण्याची इच्छा असल्याने त्या आर. माधवनकडे स्कील मॅनेजमेंटचं प्रशिक्षण घेत होत्या आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्यांची फ्लाइट अटेंडेंटसाठी निवडही झालेली.

आर. माधवन याचे आभार मानण्यासाठी त्यांनी त्याला डिनरसाठी निमंत्रण दिलं, तिथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. माधवन व सरिता यांनी लग्नपूर्वी ८ वर्षे एकमेकांना डेट केलं. त्यानंतर या जोडीने १९९१ मध्ये लग्न केलं. या जोडीला एक मुलगा आहे, ज्याचं नाव वेदांत आहे. त्याला स्विमींगमध्ये अनेक गोल्ड मेडल मिळाले आहेत.

आर. माधवनने मणीरत्नम यांच्या तामिळ चित्रपटातून २००० मध्ये मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. यानंतर त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत काम केलं. हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांत काम केल्यानंतर त्याने दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. ‘रॉकेट्री’ या चित्रपटाचं त्याने दिग्दर्शन केलं. त्याच्या नुकत्याच आलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटानेही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि १३०० कोटींची कमाई केली.