Arjun Rampal Recall 26/11 Attack Memories : सध्या सर्वत्र ‘धुरंधर २’ या चित्रपटाचीच जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे, तर अर्जुन रामपाल, आर. माधवन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ‘धुरंधर’मध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सीनही दाखवण्यात आला आहे. यामध्ये तो हल्ला टीव्हीवर बघताना अर्जुन रामपाल आणि रहमान डकैतच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्ना हसताना आणि डान्स करताना दिसले. अशातच अर्जुनने या हल्ल्याची एक आठवण शेअर केली.
अर्जुन रामपालने नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात २६/११च्या घटनेच्या आठवणींना उजाळा दिला. रविवारी (२२ मार्च) मुंबईत पार पडलेल्या ‘हॅलो! हॉल ऑफ फेम’ पुरस्कार सोहळ्यात त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी भाषण करताना त्याने सांगितले की, २६/११ रोजी झालेल्या त्या घटनेच्या अनुभवामुळे त्याला ‘धुरंधर’ चित्रपटातील भूमिका साकारण्यास मदत झाली.
सर्वजण हॉटेल ताजला जाणार होतो पण…
अर्जुन रामपाल म्हणाला, “२६ नोव्हेंबर रोजी माझा वाढदिवस असतो, त्यामुळे मित्रांना पार्टी देण्यासाठी मी २६ नोव्हेंबर २००८ रोजी वरळीतल्या ‘फोर सीझन्स हॉटेल’ येथे मित्रांना घेण्यासाठी गेलो होतो. माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण हॉटेल ताजला जाणार होतो. माझा एक मित्र तयार होत होता… देवाचे आभार की त्याला उशीर झाला. आम्ही हॉटेलच्या बारमध्ये बसून ड्रिंक ऑर्डर केलं होतं आणि त्याचवेळी माहीमच्या बाजूला बॉम्बस्फोट झाला. आम्हाला काहीच कळेना की नेमकं काय झालंय…”
पुढे तो म्हणाला, “१० मिनिटांतच फोन येऊ लागले. सुरुवातीला कुलाबा भागात गँगवॉर सुरू झाल्याचं सांगण्यात आलं आणि तिकडे जाऊ नका असं सांगितलं. काही वेळातच फोर सीझन्स हॉटेल पूर्णपणे बंद करण्यात आलं. आम्हाला त्या रात्री हॉटेलमध्येच थांबायला सांगितलं, बाहेर जाणं सुरक्षित नव्हतं.”
“२६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर…”
“२६/११ रोजी झालेल्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या सकाळी घरी जाताना मला तीन वेळा गाडी थांबवावी लागली. मला माझी प्रकृती ठीक वाटत नव्हती. नंतर जेव्हा दिग्दर्शक आदित्य धरने मला २६/११ च्या हल्ल्याचा तो प्रसंग ऐकवला, तेव्हाच मला समजलं की या चित्रपटाच्या माध्यमातून मी त्या घटनेचा बदला घेणार आहे आणि ‘धुरंधर’मध्ये मी तेच केलं”, असं तो म्हणाला.
दरम्यान, ‘धुरंधर’ ‘धुरंधर: द रिव्हेंज’मध्ये अर्जुन रामपालने ‘मेजर इक्बाल’ नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली आहे, जो या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असतो. रणवीर सिंह, आर. माधवन आणि अक्षय खन्ना यांसारख्या कलाकारांच्या सोबतीने अर्जुनने साकारलेल्या या क्रूर पात्राचे प्रेक्षक आणि समीक्षकांकडून खूप कौतुक झाले. मात्र, हा सीन माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात कठीण सीन असल्याचे त्याने म्हटले होते.
