Dhurandhar The Revenge Teaser: ५ डिसेंबर २०२५ ला प्रदर्शित झालेल्या धुरंधरची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. हा चित्रपट भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात गाजला. जवळजवळ दोन महिने मनोरंजन केल्यानंतर ३० जानेवारीला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. इतकेच नाही, तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले. निर्मात्यांनी १९ मार्च २०२६ ला धुरंधरचा दुसरा भाग प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
‘धुरंधर: द रिव्हेंज’चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
आता धुरंधरच्या दुसऱ्या भागाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. रणवीर सिंहने हा टीझर त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.रणवीर सिंहने या चित्रपटात हमजा ही भूमिका साकारली आहे. आता पाकिस्तानमध्ये जाण्याआधी त्याचा भारतात भूतकाळ काय होता, तो कसा होता, याची झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच,रेहमान डकैतला मारल्यानंतर ल्यारीमध्ये हमजाचे वर्चस्व तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याबरोबरच, टीझरमध्ये अर्जुन रामपाल, संजय दत्त यांची झलकदेखील पाहायला मिळत आहे. गोळीबार, सेलीब्रेशन, मारामारी, हिंसाचार पाहायला मिळत आहे. टीझरच्य शेवटी रणवीर सिंगचे पात्र म्हणते की हा नवीन हिंदूस्तान आहे, हा घरात घुसेल आणि मारेलसुद्धा असे म्हणताना दिसत आहे.
हा टीझर शेअर करताना रणवीर सिंगने, “ये नया हिंदूस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी”, अशी कॅप्शन दिली आहे. धुरंधर: द रिव्हेंज असे या चित्रपटाचे नाव आहे. १९ मार्च २०२६ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तसेच रणवीर सिंहने अक्षय खन्ना, संजय दत्त, आर माधवन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, यांना टॅग केली आहे. जिओ स्टुडिओजने याची निर्मिती केली आहे.
धुरंधर या चित्रपटाविषयी बोलायचे तर या चित्रपटातील सर्वच कलाकारांचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, आर माधवन, संजय दत्त, सारा अर्जुन, अर्जुन रामपाल, राकेश बेदी या सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
या चित्रपटाने भारतात ‘धुरंधर’ने ८९०.६७ कोटींची कमाई केली आहे, तर जगभरात या चित्रपटाने १४२८ कोटींची कमाई केली आहे. सध्या नेटफ्लिक्सवरही हा चित्रपट ट्रेंड होत आहे. आता धुरंधरच्या दुसऱ्या भागालादेखील प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

