Star Screen Awards Throwback : मनोरंजनविश्वात असे अनेक कलाकार असतात, जे अनेक वर्षे काम करत असतात. परंतु, त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नसतं किंवा त्यांचं काम मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं नसतं. पण, अशावेळी एखादी कलाकृती त्यांच्यासाठी टर्निंग पाईंट ठरते आणि त्यांच्या करिअरचा ग्राफ बदलतो. असंच काहीतरी घडलेलं बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झाबरोबर.

दिया मिर्झा बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये काम केलं आहे. गेली २५ वर्षे ती या इंडस्ट्रीत सक्रिय आहे. परंतु, तिला तिच्या कामामुळे हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. २५ वर्षांपूर्वी तिनं ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून पदार्पण केलेलं. परंतु, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. अशाताच आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं याबद्दल खंत व्यक्त केली आहे.

ऐश्वर्या रायबरोबर व्हायची तुलना

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिया म्हणाली, “मला वाटतं की लोकांनी माझ्याबद्दल केलेल्या सगळ्या कल्पनांना छेद देत मी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा माझी सतत ऐश्वर्या रायबरोबर तुलना केली जायची. मला आठवतं, एखादी संधी मिळवताना मीच अडथळा ठरत असल्यासारखं वाटायचं. मग मोठ्या चित्रपटांना मिळालेल्या अपयशामुळे काम मिळेनासं झालं, कारण जे लोक आधी तुम्हाला साइन करण्यासाठी रांगेत उभे असायचे, तेच अचानक तुम्हाला कमनशिबी किंवा तुम्ही पनौती आहात असं समजू लागतात. मी या सगळ्यातून गेले आहे. पण, असं असलं तरी अनेक चित्रपट समीक्षकांनी माझं कौतुकही केलेलं आहे.”

Award Banner

दिया मिर्झा पुढे म्हणाली, “२४ व्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर मी ब्रेक घेतला, त्यावेळी माझं असं झालेलं की मी खूप मेहनत करतेय, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे, पण लोकांच्या अपेक्षांचा आणि मला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये ताळमेळ बसत नव्हता.”

राजकुमार हिराणी यांच्याकडे मागितलेलं काम

दियानं पुढे तिनं राजकुमार हिराणी यांच्याकडे काम मागितल्याचं सांगितलं आहे. ती म्हणाली, “मला सतत नवीन काम करण्याची इच्छा असते. एक दशकभरापूर्वी जेव्हा राजकुमार हिराणी संजूसाठी कास्टिंग करत होते, तेव्हा मी त्यांना फोन केला होता. मी त्यांच्याबरोबर यापूर्वी लगे रहो मुन्ना भाईमध्ये काम केलं होतं. मी त्यांना म्हणालेले, “कृपया मला काम द्या, माझ्याकडे काहीच काम नाहीये, कोणीही मला काम देत नाहीये, तुम्ही चित्रपट करत आहात, तुम्ही सांगाल ते करेन, स्क्रीन टेस्टही देईन, पण मला काम द्या. त्यावर ते म्हणाले, मी रणबीर आणि टीमबरोबर बोलून कळवतो. त्यानंतर मी संजय दत्तच्या पत्नीची मान्यताची भूमिका साकारली, त्यामुळे माझं आयुष्य बदललं.”