Dia Mirza life story: बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झा तिच्या अभिनय कौशल्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असते. दोन लग्न करणारी दिया एका अनोख्या बहुसांस्कृतिक कुटुंबातून येते, त्यामुळे तिचा संबंध एकापेक्षा जास्त धर्मांशी आला आहे. जर्मन ख्रिश्चन वडील आणि बंगाली हिंदू आईच्या पोटी जन्मलेल्या दियाच्या आयुष्यात पुढे मुस्लीम वडिलांचे छत्र लाभले.
दियाचे वडील फ्रँक हँड्रिच हे जर्मन ख्रिश्चन होते, तर तिची आई दीपा या बंगाली हिंदू आहेत. दिया साडेचार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच्या आईने हैदराबादचे असणारे अहमद मिर्झा यांच्याशी लग्न केलं. अहमद मिर्झा यांनी दियाला आपलं नाव दिलं आणि तिचं संगोपन केलं.
दिया मिर्झा स्वतःला कोणत्याही एका धर्माच्या चौकटीत बांधून ठेवत नाही. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, ती ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लीम अशा तिन्ही संस्कृतींमध्ये मोठी झाली आहे आणि ती सर्व धर्मांचा आदर करते.
दिया मिर्झाचं पहिलं लग्न व घटस्फोट
दिया मिर्झाने पहिलं लग्न तिचा बिझनेस पार्टनर आणि चित्रपट निर्माता साहिल संघा यांच्याशी झालं होतं. दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते आणि त्यांनी ‘बॉर्न फ्री एंटरटेनमेंट’ ही चित्रपट निर्मिती संस्थाही एकत्र सुरू केली होती. त्यांनी १८ ऑक्टोबर २०१४ रोजी लग्न केलं होतं. पण पाच वर्षांच्या संसारानंतर २०१९ मध्ये दिया व साहिल यांनी घटस्फोटाची घोषणा केली.
“११ वर्षे एकत्र आयुष्य घालवल्यानंतर आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही वेगळे झालो असलो तरी आमच्यातील मैत्री, आदर आणि एकमेकांबद्दलचे प्रेम नेहमीच कायम राहील,” असं दिया व साहिल यांनी म्हटलं होतं.
दिया मिर्झाचं दुसरं लग्न
घटस्फोटानंतर दोन वर्षांनी २०२१ मध्ये दियाने वैभव रेखी यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं. दियाच्या या लग्नाची खूप चर्चा झाली होती. कारण तिने कोणत्याही पारंपरिक धार्मिक पद्धतींऐवजी एका महिला पंडिताच्या उपस्थितीत वैदिक पद्धतीने लग्न केलं होतं. दियाने तिच्या या लग्नात कन्यादान आणि पाठवणी या दोन्ही विधींना नकार दिला होता. तिच्या मते, स्त्री ही काही दान करण्याची वस्तू नाही, त्यामुळे त्यांनी हे विधी न करण्याचा निर्णय घेतला होता.
लग्नानंतर जुलै २०२१ मध्ये दियाने मुलगा अव्यान आझाद रेखी याचं स्वागत केलं. तसेच, वैभव रेखी यांना पहिल्या लग्नापासून समायरा नावाची एक मुलगी आहे, तिच्याबरोबरही दियाचं खूप चांगलं नातं आहे.
