Dia Mirza on relationship with stepdaughter: ‘रहना है तेरे दिल में’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणून दिया मिर्झाला ओळखले जाते. तिच्या अनेक भूमिकांना मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असते. तिने तिच्या खासगी आयुष्यात घेतलेल्या अनेक निर्णयांबद्दल ती खुलेपणाने बोलत असते.

दिया मिर्झाने साहिल संघाबरोबर २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१९ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दियाने २०२१ मध्ये वैभव रेखी यांच्याबरोबर लग्न केले. वैभव रेखी यांचेही हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक मुलगी आहे. आता अभिनेत्रीने सावत्र मुलगी समायराबरोबर कसे नाते आहे, याबद्दल वक्तव्य केले आहे.

अभिनेत्रीने नुकतीच टाइम्स इंटरनेटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने समायराबरोबर प्रेमळ व मैत्रीपूर्ण नाते असल्याचे सांगितले. तसेच समायराने दिया व वैभवचे नाते स्वीकारले नसते तर वैभवबरोबर लग्न केले नसते, असेही दिया म्हणाली.

अभिनेत्री म्हणाली, “मी ९ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मी २३ वर्षांची असताना सावत्र वडिलांचे निधन झाले. या दोन्ही घटनांमुळे माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भौतिक गोष्टींच्या मागे धावणे हे व्यर्थ असते याची मला जाणीव झाली. जेव्हा तुम्ही तुमच्या पालकांचा मृत्यू पाहता, त्यावेळी समजते की तुम्ही या जगातून काहीही घेऊन जात नाही, माणूस फक्त आठवणी मागे ठेवतो.”

सावत्र मुलीबरोबर दिया मिर्झाचे कसे आहे नाते?

समायरा व तुझ्यातील नाते घट्ट व्हावे यासाठी वैभवने काय केले? यावर दिया म्हणाली, “त्याने सुरुवातीपासूनच समायराला आमच्या नात्यात सहभागी करून घेतले. हे नाते आणि हे कुटुंब तिला स्वीकारायचे आहे की नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्याने तिलाच दिला, हे खूप महत्त्वाचे होते. जर समायराने सुरुवातीच्या काळात मला नाकारलं असतं किंवा आमच्यात खूप दुरावा जाणवला असता तर मी हे नाते पुढे नेले नसते. तिने आमचे नाते स्वीकारणे आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे होते.”

२०२४ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत दिया म्हणाली होती की, समायरा मला आई किंवा मम्मा म्हणत नाही आणि समायराने मला असे काही म्हणावे, अशी कोणतीही अपेक्षाही नाही. समायराला तिची स्वतःची आई आहे, जिला ती मम्मा म्हणते. ती मला प्रेमाने दिया म्हणून हाक मारते आणि ते मला मान्य आहे.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्याच वर्षी मे महिन्यात त्यांच्या मुलाचा, अव्यान आजाद रेखीचा जन्म झाला. दियाच्या कामाबद्दल बोलायचे तर ती लवकरच ‘इक्का’ (Ikka) मध्ये दिसणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर सनी देओल व अक्षय खन्नाही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.