Dia Mirza statement on Indian clothing history and saree blouse culture : बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा सामाजिक व राजकीय विषयांवर तिची मतं ठामपणे मांडत असते. आता तिने महिलांच्या कपड्यांवरून केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. क्रिती सेनॉनच्या जाहिरातीतील कपड्यांवरून सुरू असलेला वाद अद्याप शमला नसतानाच आता दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढा यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसतेय. एका मुलाखतीत महिलांच्या तोकड्या कपड्यांवरून संस्कृती खराब होण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना दिया मिर्झाने भारतीय पेहरावाच्या इतिहासाचा दाखला दिला.
एका मुलाखतीत दिया मिर्झा आणि रिचा चढ्ढाने महिलांच्या कपड्यांबद्दल त्यांची मते मांडली. तसेच महिलांच्या कपड्यांवरून इतका वाद का होतोय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकंच नाही तर आपल्या देशात साडीखाली ब्लाउज घालण्याची संस्कृती कधीच नव्हती, असं त्या म्हणाल्या.
कपड्यांबद्दल बोलणाऱ्यांनी धर्म व इतिहासाचा अभ्यासच केलेला नाही – रिचा चड्ढा
‘महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे संस्कृती कशी खराब होतेय?’ असा प्रश्न दिया व रिचा चड्ढाला विचारण्यात आला. यावर दिया मिर्झा म्हणाली, “मुघल काळात भारतातील महिला साडीखाली काहीही घालत नव्हत्या, मग यामुळे संस्कृती कशी खराब होतेय?” तर रिचा चढ्ढा म्हणाली, “जे कपड्यांबद्दल बोलत आहेत, त्यांनी धर्म आणि इतिहासाचा बहुधा कधी अभ्यासच केलेला नाही. ते खजुराहोला विसरले आहेत.”
स्तनांना झाकण्याची संस्कृती व्हिक्टोरियन आहे, भारतीय नाही – दिया मिर्झा
यावर दिया मिर्झा म्हणाली, “जर आपण संस्कृती, टेक्स्टाईल, पेहराव आणि इतिहासाविषयी बोलत असू, तर त्यांनी हे विसरू नये की जेव्हा साड्या विणल्या जात असत, तेव्हा ब्लाउज घातला जात नसे. आताही जे निसर्गाच्या सानिध्यात राहतात, ते आदिवासी लोक ब्लाउज घालत नाहीत. आपण नक्की कशाबद्दल बोलतोय? मी मुघल काळातील चित्रे आणि कला पाहिली आहे, ज्यामध्ये महिला पारदर्शक कुर्ता घालायच्या. त्या काळात ब्रा देखील नसायच्या. स्तनांना झाकण्याची संस्कृती ही व्हिक्टोरियन आहे. ब्लाउजची ही संस्कृती व्हिक्टोरियन संस्कृतीची देन आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही.”
दिया मिर्झाच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
दिया मिर्झाच्या या वक्तव्यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर एका युजरने तिला विचारले, “जेव्हा कपड्यांचा शोध लागला नव्हता, तेव्हा माणसं कपड्यांविना फिरत असत. मग त्यांनी कपडे घालायला का सुरुवात केली? आजही ते आधीप्रमाणे कपड्यांशिवाय का राहत नाहीत?” दुसऱ्या युजरने लिहिलं, “दिया मिर्झा तुम्हाला हे सांगणार नाही की, इस्लामिक आक्रमणांनंतर भारतात स्त्रियांच्या वेशभूषेत बदल झाला. नाहीतर आपला देशात महिलांना चेहरा झाकायची किंवा बालविवाहाची कधीच गरज नव्हती.”
