Alia Bhatt on India’s Got Latent: आलिया भट्ट सध्या ‘अल्फा’ या तिच्या आगामी सिनेमामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. ३ जुलै २०२६ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट्टबरोबर अभिनेत्री शर्वरी जोगसुद्धा दिसणार आहे. या दोन्ही अभिनेत्री विविध ठिकाणी जाऊन त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या दुसऱ्या सीझनमधील पहिल्या भागात हजेरी लावली होती. दुसऱ्या सीझनमधील पहिलाच एपिसोड प्रचंड व्हायरल झाला आहे.

आता आलिया व शर्वरीने अल्फा सिनेमाच्या प्रमोशनसाठी जयपूरमधील JECRC या युनिव्हर्सिटीला भेट दिली, त्यावेळी प्रेक्षकांमधील एका विद्यार्थ्याने तिला विचारले की वादग्रस्त शो इंडियाज गॉट लेटेंटमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला? त्याचवेळी दुसरा एक विद्यार्थी “पैसे”, असे म्हणत ओरडला. त्यावर समयचे एक वाक्य म्हणत अभिनेत्री म्हणाली, “हे कोण बोललं? कोणत्यातरी गरीब माणसाने”, त्यानंतर ती स्वत: हसताना दिसत आहे. याबरोबरच प्रेक्षकांमधून ओरडण्याचा आवाज येत आहे. हा व्हिडीओ समयनेही त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच त्याने आलियाचे कौतुकही केले आहे.

आलिया भट्ट म्हणाली…

आलिया जेव्हा इंडियाज गॉट लेटेंटमध्ये गेली होती, त्यावेळी समयने एका स्पर्धकाला विचारले की मुलीला माणसाकडून काय हवे असते? त्यावेळी प्रेक्षकांमधील एकजण पैसे म्हणून ओरडला होता. त्यावेळी आलिया म्हणालेली, “हे कोण म्हणालं?”, त्यावर समय म्हणालेला, “कोणीतरी गरीब माणूस.”

याबरोबरच इंडियाज गॉट लेटेंटचा अनुभव सांगत ती म्हणाली, “समय ज्या पद्धतीने सर्वांना हसवतो ते आम्हाला आवडतं. आम्ही खूप मजा केली. तुम्ही जे पाहिलं तो एक तासाचा एपिसोड होता, जो एडिट केला होता. तिथे आम्ही खरेतर चार ते पाच तास होतो. आम्ही जितका वेळ तिथे होतो, तितका वेळ आम्ही हसत होतो.”

समयचा मोठा चाहतावर्ग आहे. पहिल्या सीझनमध्ये यूट्यूबर रणबीर अलाहाबादिया या शोमध्ये आला होता. एका स्पर्धकाशी संवाद साधताना त्याने वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. समयचा हा शो बंद करण्यात आला होता.

दरम्यान, समयच्या या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेटफ्लिक्स तसेच यूट्यूबवर त्याचा हा शो प्रदर्शित होतो. आता दुसऱ्या भागात कोण पाहुणे म्हणून हजेरी लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.