‘दिल चाहता है’ प्रदर्शित होऊन २५ वर्षे झाली असली तरी, आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. मैत्री, नाती आणि तारुण्य यावर आधारित हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर यानिमित्त २८ ऑगस्ट रोजी मुंबईत चित्रपटातील कलाकार आणि निर्मात्यांनी एकत्र येत आठवणींना उजाळा दिला. यावेळी फरहान अख्तर, रितेश सिधवानी, आमिर खान, सैफ अली खान, डिंपल कपाडिया आणि सोनाली कुलकर्णी एकत्र आले होते. यावेळी त्यांनी ‘दिल चाहता है’च्या आठवणींना उजाळा दिला. या संवादादरम्यान डिंपल कपाडिया यांनी सुरुवातीला चित्रपटाची ऑफर नाकारल्यानंतर अखेर तो चित्रपट स्वीकारण्यामागचं कारण सांगितलं.
डिंपल कपाडिया यांनी सांगितलं की, सुरुवातीला त्या ताराची भूमिका साकारण्याबाबत साशंक होत्या. विशेषतः त्यांच्यापेक्षा वयाने बराच लहान असलेल्या पुरुषाबरोबर त्यांच्या पात्राचं असलेलं वेगळ्या स्वरूपाचं नातं पाहता, ही भूमिका स्वीकारावी की नाही याबाबत त्या संभ्रमात होत्या. मात्र, कथेची ताकद आणि ताराची व्यक्तिरेखा यामुळे अखेर त्यांनी हा चित्रपट स्वीकारला.
डिंपल कपाडिया काय म्हणाल्या?
We Are Yuvaaशी बोलताना त्या म्हणाल्या, “मला ही कथा खूप आवडली होती. मला ती अप्रतिम वाटली. आणि माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला मुलगा माझ्यावर प्रेम करतोय, ही गोष्ट माझ्या अहंकाराला सुखावणारी होती. पण मी अजिबात याची पुष्टी करणार नाही.” डिंपल कपाडिया यांनी हेही सांगितलं की, सुरुवातीला या भूमिकेला त्या योग्य न्याय देऊ शकतील की नाही, याबाबत त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे ही भूमिका दुसऱ्या अभिनेत्रीने साकारावी, असं सांगत त्या स्वतःच या भूमिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होत्या.
त्या म्हणाल्या, “तुम्ही पाहू शकता, सिद्ध (अक्षय खन्ना) परत आलेला नाही. तो मला सोडून गेला आहे. पण हे पात्र चांगलं असलं तरी माझ्यासाठी थोडं कठीण होतं. माझ्या स्वभावानुसार मी या भूमिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होते. मी इतर अभिनेत्रींची नावंही सुचवत होते. हे पात्र आपण साकारू शकू का? एवढं धाडसच माझ्यात नव्हतं. माझ्यामध्ये ही भूमिका साकारण्याचं धाडस नव्हतं. पण देवाचे आभार, अखेर सद्बुद्धीने विजय मिळवला. देवाची कृपा आहे.”
फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ २००१ मध्ये प्रदर्शित झाला, तेव्हा चित्रपटातील मैत्री आणि शहरातील जीवनशैलीचं चित्रण नेहमीच्या बॉलीवूड चित्रपटांच्या चौकटीपेक्षा वेगळं होतं. चित्रपटाच्या केंद्रस्थानी तीन मित्र होते. आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांनी आकाश, समीर आणि सिद्धार्थ यांच्या भूमिका साकारल्या होत्या. कॉलेजमधून पुढील आयुष्याकडे वाटचाल करताना या तिघांनाही प्रेम आणि आयुष्यातील अनेक वास्तवांना सामोरं जावं लागतं.
