चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक-निर्माते जितके महत्त्वाचे असतात, तितकेच चित्रपटाची कथा लिहिणारे लेखकही महत्त्वाचे असतात. सलीम खान हे अशा लेखकांपैकीच एक आहेत. अनेक चित्रपटांच्या उत्तम कथा लिहीत त्यांनी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी लेखकांना मिळणाऱ्या मानधनाविषयी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले सलीम खान?
सलीम खान यांनी नुकतीच ‘एनडीटीव्ही’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी सांगितले, “मी ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये आलो त्या वेळची परिस्थिती अशी होती की, लेखकांना योग्य मोबदला मिळत नसे. त्यावेळी लेखकांना ज्या प्रकारे वागणूक दिली जायची, त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. लेखकांना महत्त्वही कमी दिलं जात असे आणि पैसेही कमी दिले जात असत. त्यांचा मोबदला इतका कमी होता की, त्यांना निर्मात्यांकडून पैसे मिळवण्यासाठी त्यांना ‘माझ्या मुलीची फी भरण्यासाठी मला पैशांची गरज आहे’ किंवा ‘मला वीज बिल भरायचं आहे’, अशी कारणं सांगावी लागत असत. त्या काळात लेखकांना वेळेवर मानधन मिळणं ही मोठी गोष्ट होती, मग तर त्यांना अभिनेत्यांइतकं मानधन मिळण्याचा प्रश्नच नव्हता.”
पुढे ते म्हणतात, “जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो आणि अभिनेता म्हणून काम करायला लागलो, तेव्हा मला समजलं की, चित्रपटाची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची पटकथा. जर कथानक चांगलं नसेल, तर चित्रपट यशस्वी होऊ शकत नाही. केवळ चांगली स्क्रिप्टच कलाकारांना यशस्वी होण्याची संधी देऊ शकते.”
सुरुवातीला गुरू दत्त यांच्या चित्रपटासाठी अनेक पटकथा लिहिणारे अबरार अल्वी यांचा सहायक म्हणून मी काम करीत असे. त्यावेळी मी त्यांना एकदा म्हटले, “एक वेळ येईल जेव्हा लेखकांना अभिनेत्यांइतकंच मानधन दिलं जाईल.” हे ऐकल्यानंतर त्यांना धक्का बसला आणि त्यांनी मला सांगितले, “कोणासमोरही हे पुन्हा म्हणू नकोस. ते तुला वेडा म्हणतील.” मी विचारलं, “का नाही?” त्यांनी मला सांगितलं, “दिलीप कुमार यांनी एका चित्रपटासाठी १२ लाख रुपये घेतले, तुला वाटतं का की, लेखकाला कोणी इतके पैसे देईल?” अगदी प्रसिद्ध लेखकांनाही त्या वेळी फक्त १० हजार रुपये मानधन मिळायचे. मी म्हणालो, “जेव्हा लोकांना समजेल की चित्रपट लेखकाच्या स्क्रिप्टमुळे यशस्वी होतो, तेव्हा ते पैसे देतील.” चिडून ते म्हणाले, ‘मला तुझ्याशी वाद घालायचा नाही. इतर कोणाच्याही समोर हे पुन्हा बोलू नकोस.”
अनेक वर्षांनंतर जेव्हा सलीम खान चित्रपटांसाठी कथा लिहू लागले, त्यावेळी त्यांची भेट जावेद अख्तर यांच्याशी झाली. या जोडीनं ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘त्रिशूल’, ‘शक्ती’, अशा अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. सलीम खान कथा आणि पात्रांवर काम करायचे; तर जावेद अख्तर हे संवादांची जबाबदारी सांभाळायचे.
सलीम खान म्हणतात, “अशी एक वेळ आली, ज्यामध्ये मला माझ्या स्क्रिप्टसाठी अभिनेत्यापेक्षा जास्त पैसे दिले गेले. मला त्या चित्रपटाचं नाव उघड करायचं नाही; मात्र मला जास्त मानधन मिळालं होतं. मी लगेच अबरार अल्वी यांना फोन केला आणि म्हटलं की, तुम्हाला आठवतं मी एकदा म्हटलं होतं, अशी वेळ येईल ज्यावेळी कलाकारांइतकेच पैसे पटकथा लिहिणाऱ्यांनाही दिले जातील. ते म्हणाले की, हो. मी त्यांना सांगितले की, मी कलाकारापेक्षा जास्त पैसे घेतले आहेत.”
दरम्यान, सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यावर आधारित ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडीओवर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाली आहे. त्यामध्येदेखील लेखकांना इंडस्ट्रीमध्ये कमी महत्त्व आणि मानधन दिलं जातं, असे म्हटले आहे.
© IE Online Media Services (P) Ltd