Dilip Kumar Death Anniversary: सिनेविश्वाचा एक काळ गाजवणारे अभिनेते दिलीप कुमार यांची आज पुण्यतिथी असून आजही त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनामध्ये ताज्या आहेत. दिलीप कुमार यांनी प्रभावी अभिनयामुळे बॉलीवूडवर राज्य केले होते. दिलीप कुमार आणि सायरा बानू यांची प्रेमकहानी नेहमीच चर्चेमध्ये राहिली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणीत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

सायरा बानू यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलं, “आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माणूस कधीच पूर्णपणे निघून जात नाही. तो आपल्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहतो. काळ पुढे सरकत असला तरी आठवणी मात्र आपली साथ कधीच सोडत नाहीत. त्या नकळत पुन्हा पुन्हा समोर येतात आणि प्रत्येक हसू, प्रत्येक नजर, प्रत्येक शब्द पुन्हा एकदा जिवंत करून जातात. त्या क्षणी असं वाटतं की काहीच हरवलं नाही. एखाद्याची मनापासून आठवण येणं हाच कदाचित सर्वात सुंदर पुरावा असतो की, त्यांना कधीच विसरलेलो नाही. आणि मला अनेकदा असे वाटते की, या जगाचा निरोप घेण्यापूर्वी साहेबांनी (दिलीप कुमार) मला अमूल्य असा ठेवा दिला; त्यांच्या आठवणींचा समृद्ध खजिना. या आठवणींच्या सहवासातच मी माझे पुढचे आयुष्य घालवणार आहे.”

माझ्या आयुष्याचा आधार – सायरा बानू

पुढे त्यांनी लिहिले, “७ जुलै २०२१ रोजी, दिलीप कुमार यांनी फक्त मलाच नाही, तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या संपूर्ण जगाचा निरोप घेतला. त्यांचे कुटुंबीय, मित्र, चाहते आणि चित्रपटसृष्टीतील सहकारी सर्वांच्या मनात अशी पोकळी निर्माण झाली, जी शब्दांनी भरुन निघणार नाही. पण माझ्यासाठी ते फक्त लोकप्रिय अभिनेते नाही तर माझ्या आयुष्याचा आधार होते. आम्ही फक्त एकत्र जगलो नाही, तर आयुष्य परिपूर्ण बनवले. ते उदार स्वभावाचे होते आणि प्रत्येक जबाबदारी अत्यंत शांतपणे सांभाळत होते. त्यांची जोडीदार म्हणून आयुष्य जगण्याचं मला भाग्य लाभलं.”

सायरा बानू यांनी लिहिलं, “जग त्यांना रुपेरी पडद्यावरील महान कलाकार म्हणून लक्षात ठेवेल. पण ज्यांनी जवळून माहीत आहे, त्यांच्यासाठी ते दानशूर, जिवाभावाचे मित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. आज मागे वळून पाहताना जाणवतं की, मी फक्त इतिहास घडताना पाहिला नाही, तर त्याचा एक भाग बनले. नकळतपणे एका महान वारशाचा साक्षीदार होता आले, ज्याची अनेक वर्षे आठवण काढली जाईल,”

पुढे त्यांनी लिहिले, “साहेब माझ्या नजरेआड होऊन पाच वर्षे झाली आहेत, पण ते माझ्या आयुष्यातून कधीच दूर गेले नाहीत. खरं प्रेम काळाच्या ओघात कधीच कमी होत नाही. माझ्या प्रत्येक आठवणीत त्यांचं अस्तित्व आजही जिवंत आहे आणि प्रत्येक दिवस आठवणींमध्ये जातो. दिलीप कुमार यांच्यावर प्रेम करण्याचा आणि त्यांच्याकडून प्रेम मिळवण्याचा जो मान मिळाला; त्यामुळे मी भाग्यवान ठरले.जोपर्यंत आपली पुन्हा भेट होत नाही तोपर्यंत मी कायम कृतज्ञ असेन,” अशी भावनिक पोस्ट सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींमध्ये लिहिली आहे.