Umesh Mehra on Dilip Kumar and Shahrukh Khan: हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग म्हणून दिलीप कुमार यांची ओळख निर्माण झाली होती. त्यांचा मोठा चाहतावर्ग होता. त्यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत ५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांसारख्या कलाकारांनीही दिलीप कुमार यांच्या अभिनयाचा त्यांच्या कारकि‍र्दीवर मोठा प्रभाव असल्याचे अनेकदा सांगितले आहे.

दिग्दर्शक उमेश मेहरा यांनी दिलीप कुमार यांच्याबरोबर त्यांच्या शेवटच्या ‘किला’ (Qila) चित्रपटात काम केले. तेव्हा त्यांना एक गोष्ट जाणवली. एकेकाळी भारतीय सिनेसृष्टीत अत्यंत प्रभावशाली अभिनेता म्हणून ओळख असलेल्या दिलीप कुमार यांना नव्या पिढीतील प्रेक्षक ओळखतही नव्हते.

“त्याआधी त्यांनी जवळपास १५ ते १८ वर्षे कोणत्याही चित्रपटात…”

‘डीडी उर्दू’ला दिलेल्या मुलाखतीत उमेश मेहरा यांनी दिलीप कुमार यांची आठवण सांगितली. ते म्हणाले, “मी त्यांच्याबरोबर जेव्हा काम केले, त्याआधी त्यांनी जवळपास १५ ते १८ वर्षे कोणत्याही चित्रपटात काम केले नव्हते. तरीही ते उत्तम अभिनय करीत होते. मात्र, इतक्या काळात प्रेक्षक त्यांना विसरले होते.”

जेव्हा किला हा सिनेमा प्रदर्शित झाला. त्यावेळी प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे बघण्यासाठी उमेश मेहरा हे थिएटरमध्ये प्रेक्षकांमधून फिरत होते. त्यावेळी त्यांना जाणवले की, तरुणांना दिलीप कुमार कोण आहेत हेच माहीत नाही. त्यांनी, “मध्यंतराच्या वेळी आम्ही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकत होतो. तेव्हा एक मुलगा थिएटरमधून बाहेर पडताना त्याच्या वडिलांना म्हणाला की, हे तर शाहरुख खानची नक्कल करीत आहेत. ते ऐकल्यानंतर खूप वाईट वाटले”, असे म्हणत उमेश मेहरा यांनी खेद व्यक्त केला.

विशेष म्हणजे, शाहरुखने विविध मुलाखतींतून त्याच्या अभिनयावर दिलीप कुमार यांचा प्रभाव असल्याचे सांगितले आहे. शाहरुख खान यांचे दिलीप कुमार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. सायरा बानू अनेकदा शाहरुख मुलगा असल्याचे म्हणत असत. दिलीप कुमार यांच्या आयुष्याच्या अखेरच्या काळातही शाहरुख त्यांना भेटत राहिला.

दिलीप कुमार यांचे ७ जुलै २०२१ रोजी निधन झाले. त्यावेळी ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतरही भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांच्या अभिनयाचा प्रभाव कायम असल्याचे पाहायला मिळते. आजही अनेक कलाकार वेळोवेळी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देतात.