Sardaar Ji 3 Movie Trailer : प्रसिद्ध अभिनेता व गायक दिलजीत दोसांझची गाणी जगभरात लोकप्रिय आहेत. त्याच्या पंजाबी गाण्यांबरोबरच तो बॉलीवूडमधील काही चित्रपटांमध्येही झळकला आहे. त्यामुळे त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. गाणी व अभिनयामुळे कायमच चाहत्यांच्या कौतुकास पात्र ठरणारा दिलजीत सध्या ट्रोल होत आहे. याचे कारण म्हणजे त्यानं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबरच्या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. त्यामुळेच दिलजीत वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

दिलजीतने त्याच्या ‘सरदारजी ३’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर नेटकरी भडकले आहेत. त्यामुळे अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. शुक्रवारी (२७ जून) हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये दिलजीत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. परंतु, त्याने शेअर केलेल्या ट्रेलरमधून पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसुद्धा पाहायला मिळत आहे. हानिया त्याच्यासह या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या अकाउंटवर भारतात बंदी आणण्यात आली. अभिनेत्री वाणी कपूर व पाकिस्तानी अभिनेता फावद खानची मुख्य भूमिका असलेला ‘अबीर गुलाल’ हा चित्रपटही त्यावेळी चर्चेत होता. परंतु, या चित्रपटावरही भारतात बंदी आणण्यात आली. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यानंतर आता दिलजीतने हानिया आमिरबरोबरच्या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नेटकरी भडकले असून, अनेकांनी कमेंट करीत त्याला प्रचंड ट्रोल केले आहे.

दिलजीत दोसांझने या ट्रेलरला ”सरदारजी ३’ २७ जूनला प्रदर्शित होत आहे’, असं कॅप्शन दिलं होती. त्यानंतर या व्हिडीओखाली एका नेटकऱ्याने “दिलजीत दोसांझ आणि त्याची टीम असंवेदनशील कृत्य करीत आहे”. दुसऱ्याने “पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आणलेली असताना दिलजीत तू हानिया आमिरबरोबरचा चित्रपट प्रदर्शित करीत आहेस. त्यासाठी तुला लाज वाटायला हवी”, असे म्हटले आहे. तसेच एका नेटकऱ्याने “दिलजीत दोसांझ ऑपरेशन सिंदूर आणि भारताबद्दल चुकीचं वक्तव्य करणाऱ्या हानिया आमिरबरोबरचा चित्रपट प्रदर्शित करीत आहे. त्यासाठी भारत सरकारनं त्याच्याविरोधात कारवाई करायला हवी”, असे म्हटले आहे. तर एक्सवरसुद्धा या चित्रपटाच्या ट्रेलरमुळे दिलजीतला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार दिलजीतने पहलगाम हल्ल्यापूर्वी या चित्रपटात काम केले होते. ‘सरदारजी ३’ हा चित्रपट भारतात प्रदर्शित न होता, जगभरात प्रदर्शित होणार आहे. दिलजीतने रविवारी २२ जून रोजी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला होता. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारत सरकारने बंदी आणली होती. परंतु, आता हानिया आमिरला ‘सरदारजी ३’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहताच प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला असून, त्यामुळे दिलजीत दोसांझ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दिलजीत सनी देओलची मुख्य भूमिका असलेल्या ‘बॉर्डर २’ या चित्रपटातही झळकणार आहे. त्यामुळेच एकीकडे देशभक्तीवर आधारित या चित्रपटात काम करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्याने अभिनेत्याला ट्रोल केले जात आहे.