Diljit Dosanjh Wife & Son Secret Family Mystery Detiails : दिलजीत दोसांझ जगभरात लाइव्ह शो करत असतो आणि त्याची लोकप्रियता फक्त एका देशापुरती मर्यादित नाही. तो जगातील सर्वाधिक लोकप्रिय पॉप स्टार्सपैकी एक असूनही त्याच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी माहिती समोर उपलब्ध आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका रिपोर्टनुसार, दिलजीत २०२२ पासून अमेरिकेचा नागरिक झाला आहे. तेव्हापासून तो अमेरिकन पासपोर्टवर जगभर प्रवास करत असल्याचं सांगितलं जात आहे. या रिपोर्टमध्ये त्याची पत्नी संदीप कौरही अमेरिकेची नागरिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मनोरंजनविश्वापासून दूर आहे दिलजीतची बायको व मुलगा
दिलजीत दोसांझ गेली दोन दशकं मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. मात्र, तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दल कधीच फार बोलताना दिसत नाही. त्याने आजपर्यंत त्याने त्याच्या लग्नाबद्दल किंवा मुलाबद्दल सार्वजनिकरित्या फारसं भाष्यही केलेलं नाही. २०२४ मध्ये ‘द इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका प्रोफाइलमध्ये दिलजीतला एक मुलगा असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्या रिपोर्टनुसार, दिलजीत खूप अलिप्त स्वभावाचा व्यक्ती आहे. त्याच्या कुटुंबाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. मात्र, त्याच्या जवळच्या लोकांच्या मते त्याची पत्नी अमेरिकन-इंडियन आहे आणि त्यांना एक मुलगा आहे. तसेच त्याचे आई-वडील लुधियानामध्ये राहतात. असं लिहिलं होतं.
लोकप्रिय गायकाने केलेला दिलजीतच्या कुटुंबाबद्दल खुलासा
दिलजीत दासोंझ यांच्या इच्छा आणि कुटुंबाला या झगमगाटाच्या दुनियेपासून दूर ठेवण्याच्या निर्णयाचा त्याच्या मित्रांनी व सहकाऱ्यांनी नेहमीच आदर केला आहे. त्यामुळे त्याच्या परवानगीशिवाय कुणीही त्याच्या कुटुंबाबद्दल सार्वजनिकरित्या बोलले नाही. मात्र, जून २०२४ मध्ये गायक-अभिनेता Ammy Virk ने दिलजीत विवाहित असल्याचे संकेत दिले होते. तसेच त्याने दिलजीतच्या कुटुंबाला जगापासून दूर ठेवण्याच्या निर्णयालाही पाठिंबा दिला होता.
न्यूज १८ला दिलेल्या मुलाखतीत अॅमी म्हणाला होता, “तुम्ही कोणालाही थांबवू शकत नाही. दिलजीत पाजींच्या दृष्टीने पाहिलं तर हे त्यांचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामागे नक्कीच काही कारण असेल की ते त्यांच्या कुटुंबाला जगासमोर आणू इच्छित नाहीत. माझीदेखील पत्नी आणि मुलगी आहे. मलाही त्यांना सार्वजनिक आयुष्यात आणायचं नाही. त्यांनाही ते नको आहे. सध्या त्या कुठेही फिरू शकतात आणि लोकांना माहिती नसतं की त्या अॅमी किंवा दिलजीत यांच्या कुटुंबातील आहेत. लोकांना कळलं तर त्यांच्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो.”
एका कॉन्सर्टमध्ये आई व बहिणीची करुन दिलेली ओळख
दिलजीत नेहमीच त्याच्या खासगी आयुष्याबाबत खूप सावध राहिला आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२४ मध्ये यूकेमधील एका कॉन्सर्टदरम्यान त्याने त्याच्या आई आणि बहिणीची चाहत्यांना ओळख करून दिली, तेव्हा अनेक चाहते आश्चर्यचकित झाले होते. परफॉर्मन्सदरम्यान दिलजीत थेटत्याच्या आईजवळ गेला आणि प्रेक्षकांना तिची ओळख करून दिली. त्या वेळी त्याची आई खूप भावुक झाली होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रूही आले होते. दिलजीतने त्यांना मिठी मारत हा खास क्षण साजरा केला. त्यानंतर त्याने तिथेच उभ्या असलेल्या त्याच्या बहिणीचीही चाहत्यांना ओळख करून दिली होती.
दिलजीतने रणवीर अल्हाबादियाशी संवाद साधताना त्याच्या बालपणाविषयी सांगितलं होतं की, तो फक्त ११ वर्षांचा असताना जालंधरजवळील दोसांझ कलां हे गाव सोडून लुधियानाला गेला होता. त्याच्या मामांनी त्याला शहरात घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. दिलजीत म्हणाला, “मामांनी आई-वडिलांना सांगितलं, याला माझ्यासोबत शहरात पाठवा आणि त्यांनी लगेच होकार दिला. त्यांनी मला विचारलंसुद्धा नाही.” पुढे त्याने सांगितलं की लुधियानामध्ये तो एका छोट्या खोलीत एकटाच राहत होता. गायक याबद्दल म्हणालेला, “मी शाळेत जायचो आणि परत यायचो. खोलीत टीव्हीही नव्हता, त्यामुळे माझ्याकडे खूप वेळ असायचा. त्या काळात मोबाईल फोन नव्हते. घरी फोन करायचा असल्यास पैसे लागायचे. हळूहळू माझं कुटुंबापासून अंतर वाढत गेलं”. दिलजीत पुढे म्हणालेला, “मी माझ्या आईचा खूप आदर करतो. माझे वडीलही खूप चांगले स्वभावाचे आहेत. त्यांनी मला कधी काही विचारलं नाही. मी कोणत्या शाळेत शिकतो, हेही त्यांनी विचारलं नव्हतं. पण हळूहळू मी सग्ळ्यांपासून दूर जात होतो.”
दिलजीत दोसांझचा जन्म १९८४ मध्ये झाला. त्यांचे वडील बलबीर सिंग हे पंजाब रोडवेजमध्ये बस चालक म्हणून काम करत होते.पंजाबमध्ये संगीत क्षेत्रातून करिअरची सुरुवात केल्यानंतर दिलजीतने प्रादेशिक चित्रपटांमध्येही काम करण्यास सुरुवात केली. काही वर्षांतच त्याने आपल्या गाण्यांमुळे देशभरात लोकप्रियता मिळवली आणि अनेक हिंदी चित्रपटांमध्येही झळकला.
आज दिलजीत जगभरातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक बनला असून त्याच्या कॉन्सर्टसाठी मोठमोठी स्टेडियम्स हाऊसफुल होताना दिसतात. नुकताच तो त्याच्या नव्या अल्बमच्या प्रमोशनसाठी जिम्मी फॅलॉनच्या Jimmy Fallon लेट नाईट शोमध्येही दिसला होता.
