Dimple Kapadia Statement about Nana Patekar: ‘क्रांतिवीर’, ‘प्रहार’ आणि ‘अंगार’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम करणारे नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया हे एकेकाळी बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी मानली जायची. दोघांमध्ये उत्तम मैत्री असतानाही डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकरांबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं होतं. नाना अत्यंत प्रतिभावान असले तरी त्यांनी त्यांची नकारात्मक अन् भयंकर बाजू लपवून ठेवली आहे, असं डिंपल यांनी म्हटलं होतं. एकाच वेळी नानांच्या अभिनयाचे कौतुक करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची भयंकर बाजू असल्याचं विधान डिंपल कपाडियांनी केलं होतं.
नाना पाटेकर व डिंपल कपाडिया यांनी ‘प्रहार: द फायनल अटॅक’, ‘अंगार’ आणि ‘क्रांतिवीर’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी त्यांनी ‘तुम मिलो तो सही’ नावाचा चित्रपट केला होता. हा चित्रपट २०१० साली आला होता.
नाना पाटेकर नकोसे वाटतात – डिंपल कपाडिया
नाना पाटेकरांबरोबर बऱ्याच वर्षांनंतर काम करण्याचा अनुभव कसा होता? असं डिंपल कपाडियांना ‘एनडीटीव्ही’च्या एका मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. त्याचं डिंपल कपाडियांनी असं उत्तर दिलं होतं की अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. “मला नाना घृणास्पद, नकोसे वाटतात,” असं डिंपल नाना पाटेकरांबद्दल म्हणाल्या होत्या.
नाना पाटेकरांच्या कितीही चुका माफ करू शकते – डिंपल कपाडिया
नाना पाटेकरांबद्दल चांगल्या आणि वाईट गोष्टी डिंपल कपाडियांना विचारण्यात आल्या होत्या. उत्तर देताना डिंपल म्हणाल्या, “चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूने. खरं तर ते खूप प्रतिभावान आहेत, यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की त्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते,” असं वक्तव्य डिंपल कपाडियांनी म्हटलं होतं.
नाना चांगले मित्र, पण त्यांची वाईट बाजू पाहिलीय – डिंपल कपाडिया
डिंपल यांनी पुढे नाना पाटेकरांची एक नकारात्मक बाजू असल्याचंही मुलाखतीत सांगितलं होतं. “एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागतात, आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्रही आहोत, पण मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे. त्यांची नकारात्मक बाजू. आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लवपून ठेवतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवली आहे,” असं डिंपल कपाडियांनी म्हटलं होतं.
