Dimple Kapadia Hair Care Routine Secret: अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी आपल्या प्रभावी अभिनय आणि व्यक्तिमत्त्वाने सिनेविश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजही सिनेमांमध्ये त्यांचा वेगळेपणा आपल्याला दिसून येतो. डिंपल यांच्या खास लूकबरोबर त्यांच्या केसांची अनेकदा चर्चा रंगते. वयाच्या ६९ व्या वर्षीही त्यांचे दाट आणि सुंदर केस कसे काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. अखेर डिंपल कपाडिया यांनी त्या केसांची कशी निगा राखतात, याबद्दल सांगितले.

२०२१ मध्ये ‘व्होग इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत डिंपल कपाडियांनी त्यांच्या घनदाट केसांचे खरे रहस्य सांगितले होते. केस मुलायम आणि मजबूत राहण्यासाठी केसांना नियमित तेल लावण्याचा सल्ला दिला आहे. डिंपल यांनी केसांना तेल लावण्याचे महत्त्व सांगितले होते. त्या म्हणाल्या, “मी रात्रभर केसांना तेल लावून ठेवते. ते तेलसुद्धा मी घरी तयार करते.”

डिंपल कपाडिया बनवतात खास तेल

पुढे डिंपल कपाडियांनी त्या खास तेल कशा पद्धतीने तयार करतात, याबद्दलही सांगितले. डिंपल म्हणाल्या, “माझ्या सीक्रेट तेलामध्ये बदामाचे आणि चंदनाचे तेल हे बेस म्हणून असते. त्यात मी जिरेनियम, रोझमेरी व लॅव्हेंडर ही इतर तेले मिसळते. केसांना कायम तेल लावले पाहिजे. माझ्या पुढच्या पिढीलाही मी हेच सांगणार आहे. या तेलाबद्दल मी माझ्या नातवंडांनासुद्धा सांगणार आहे. केसांना तेल लावा आणि केसांना रंग देऊ नका.”

पुढे त्या म्हणाल्या, “तेल लावल्यानंतर मी केसांना घरीच बनवलेल्या हेअर पॅकने मसाज करते. त्या पॅकमध्ये पाच अंड्यांतील पांढरा भाग, एक पूर्ण अंडे आणि एक केळे असते. साधारणपणे ३० मिनिटांपर्यंत हा पॅक डोक्यावर लावते आणि नंतर कोमट पाण्याने केस धुऊन घेते.”

आहाराचाही केसांच्या आरोग्यावर परिणाम

डिंपल कपाडिया यांनी त्यांचे केस चांगले राहण्यामध्ये त्यांच्या आहाराचाही मोठा वाटा असल्याचे सांगितले. लहानपणी त्यांचे घर समुद्राच्या जवळ होते. त्यामुळे आहारामध्ये मासे आवर्जून केले जात होते. त्यामुळे आहारात प्रथिनांचा समावेश असायचा. त्या म्हणाल्या, “मी समुद्रकिनाऱ्याच्या भागात राहिल्यानं त्याचा माझ्या केसांना खूप फायदा झालाय, असं मला वाटतं. त्यामुळे केस चांगले ठेवायचे असतील, तर आहारात भरपूर प्रथिनांचा समावेश करा. चांगला आहार घ्या आणि काजू खा.”

कांद्याच्या रसाचा मजेशीर किस्सा

डिंपल यांनी केसांसाठी कांद्याचा रस वापरून पाहिल्याचा एक मजेशीर किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या, “एकदा मुलं आणि नातवंडांबरोबर प्रवास करताना त्यांनी केसांना कांद्याचा रस लावला होता. त्याचा इतका उग्र वास होता की, चार वेळा शॅम्पू केल्यानंतरही तो पूर्णपणे गेला नव्हता. कारमध्ये केस वाळवण्यासाठी त्यांनी खिडकी उघडली; पण कांद्याच्या वासामुळे आजूबाजूच्या लोकांच्याही डोळ्यांत पाणी येऊ लागले होते. केसांसाठी कांदा चांगला असला तरी थेट रस लावण्यापेक्षा कांद्याचा अर्क असलेले तेल वापरणे जास्त चांगले आहे.”

डिंपल यांनी हेअर ऑयलिंगची सवय लहानपणापासूनच असल्याचेही सांगितले. त्यांची आई नियमितपणे त्यांच्या केसांना तेल लावून दोन घट्ट वेण्या घालत असल्याची अशी आठवणही डिंपल कपाडिया यांनी सांगितली होती.