Dimple Kapadia and Rajesh Khanna Love Story : लोकप्रिय अभिनेत्रीने केलेल्या लग्नाच्या घोषणेमुळे संपूर्ण बॉलीवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. अवघ्या १६ व्या वर्षी एका तरुण अभिनेत्रीने १५ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या सुपरस्टारशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्या काळात लाखो तरुणी ज्या सुपरस्टारवर फिदा होत्या, त्याच अभिनेत्याशी तिने लग्नगाठ बांधली. वयातील मोठे अंतर आणि या नात्याची अचानक झालेली घोषणा यांमुळे ही प्रेमकहाणी वर्षानुवर्षे चर्चेचा विषय ठरली. ही जोडी होती सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल कापडिया यांची. डिंपल यांनी अवघ्या १६ व्या वर्षी राजेश खन्ना यांच्याशी विवाह केला होता. आज डिंपल कापडिया यांचा ६९ वा वाढदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया…
कोणती होती ही जोडी?
मनमोहक सौंदर्य आणि जिवंत अभिनय यांमुळे डिंपल कापडिया यांनी काही दिवसांमध्येच बॉलीवूडमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रेक्षकांसह सिनेविश्वातही तिच्याबाबत जोरदार चर्चा रंगली.
कारण- डिंपलने बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. त्यावेळी राजेश खन्ना हे लोकप्रियतेच्या शिखरावर होते आणि तरुणी त्यांच्या अभिनय व तारुण्यावर घायाळ होत होत्या. मात्र, राजेश खन्ना यांनी डिंपल कापडिया यांच्याशी लग्न करण्याचे ठरवले.
राजेश व डिंपल यांची कधी झाली होती भेट?
सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचा मार्च १९७३ मध्ये विवाह झाला. विशेष बाब म्हणजे लग्नाच्या वेळी डिंपल या फक्त १६ वर्षांच्या होत्या; तर राजेश खन्ना ३१ वर्षांचे होते. दोघांमध्ये १५ वर्षांचे अंतर होते. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट अहमदाबादमधील नवरंगपुरा स्पोर्टस् क्लबमध्ये झाली होती. १९७० च्या दशकात राजेश खन्ना तेथील एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तिथेच त्यांची डिंपलशी भेट झाली आणि पहिल्याच भेटीत ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. या प्रेमाची भावना इतकी दृढ होती की, दोघांनी वयातील अंतराची पर्वा न करता, लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
पुढे नात्यामध्ये आले वेगळेच वळण
राजेश खन्ना व डिंपल कापडिया यांनी सुरुवातीच्या काळामध्ये दोन ते तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला. लग्नानंतर या जोडीने ट्विंकल व रिंकी अशा दोन मुलींना जन्म दिला. मात्र, त्यानंतर लवकरच राजेश आणि डिंपल यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. राजेश खन्ना आणि डिंपल कापडिया हे वेगवेगळे राहू लागले. दोघांनी कधीही घटस्फोट घेतला नसला तरी ते पूर्णपणे वेगळे झाले. मात्र, राजेश खन्ना यांच्या शेवटच्या काळामध्ये डिंपल यांनी राजेश खन्ना यांची काळजी घेतली आणि त्या त्यांच्यासोबत राहत होत्या. ही लव्ह स्टोरी यशस्वी ठरली नसली तरी त्यांच्या लग्नाची चर्चा आजही सिनेविश्वामध्ये चर्चिली जाते.
