Dimple News : अभिनेत्री डिंपल कपाडिया त्यांच्या खास वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखळल्या जातात. डिंपल यांचा पहिला सिनेमा होता बॉबी. जो सुपरडुपरहिट ठरला होता. राज कपूर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमाची एक खास आठवण आणि १२ व्या वर्षी झालेला कुष्ठरोग याची आठवण आता डिंपल कपाडिया यांनी एका मुलाखतीत सांगितली आहे. डिंपल कपाडिया किशोरवयात असताना दिग्दर्शक राज कपूर यांनी 'बॉबी' सिनेमातल्या बॉबी या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवडलं होतं. माझ्या आयुष्यातला तो संपूर्ण कालावधी एखादी जादू वाटावी इतका सुंदर होता असं डिंपल यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाल्याचीही आठवण सांगितली. एका दिग्दर्शकाने तुझ्यावर बहिष्कार टाकतील असं सांगितलं होतं डिंपल ( Dimple ) म्हणाल्या, मला १२ व्या वर्षी कुष्ठरोग झाला होता, नंतर तो बराही झाला. मात्र त्यावेळी मला माझ्या एका मित्राने सांगितलं की तुला आता शाळेतून काढून टाकतील. मी त्यावेळी फक्त १२ वर्षांची होते. त्या म्हणाल्या माझे वडील चुन्नीभाई कपाडिया हे चित्रपट व्यवसायातील अनेक लोकांना ओळख होते. त्यावेळचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक हा त्यांच्या सख्ख्या मित्रारखा होता. त्याने मला काहीतरी अपशब्द ऐकवले. मला कुष्ठरोग झाला होता आणि त्याची खूण माझ्या कोपरावर होती. तुझ्यावर बहिष्कार घातला जाईल हे मला माहीत आहे असं तो मला म्हणाला. त्यावेळी मी बहिष्कार हा शब्दच पहिल्यांदा ऐकला, बहिष्कार म्हणजे काय? ते पण मला माहीत नव्हतं. असं डिंपल यांनी FICCI FLO Jaipur Chapter शी बोलताना सांगितलं. तसंच कुष्ठरोग झाला असतानाच राज कपूर आयुष्यात आले. त्यांनी बॉबी सिनेमासाठी विचारलं ही आठवणही डिंपल ( Dimple ) यांनी सांगितली. हे पण वाचा- Raj Kapoor : ‘..पर हम तुम्हारे रहेंगे सदा!’ जिंदा दिल राज कपूरना आठवताना राज कपूर सुंदर मुलीच्या शोधात होते डिंपल ( Dimple ) म्हणाल्या, "राज कपूर यांना अशा मुलीला भेटायचं होतं जी खूप सुंदर आहे. पुढे मला 'बॉबी' सिनेमा मिळाला. कुष्ठरोग झाल्याने जो धक्का बसला होता त्यातून मी बरंच काही मिळवू शकले. मला वाटतं 'बॉबी' हा सिनेमाही त्यातलाच एक भाग आहे. 'बॉबी' या सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आणि अनोखा होता. माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर आणि स्वप्नवत वाटेल असाच काळ होता. तसंच सुरुवातीला स्क्रीन टेस्टमधून मी रिजेक्ट झाले होते. पण या घटनेने राज कपूर माझ्या आयुष्यात आले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही." असंही त्यांनी सांगितलं. डिंपल यांनी सांगितली बॉबी या सिनेमाच्या वेळची आठवण, काय म्हणाल्या डिंपल? बॉबीची स्क्रीन टेस्ट झाल्यावर सुरुवातीला नाकारली गेली होती भूमिका डिंपल ( Dimple ) पुढे म्हणाल्या, "मी 'बॉबी' सिनेमासाठी मी स्क्रीन टेस्ट दिली पण रिजेक्ट झाले. त्यावेळी मी एकदा पेपर वाचत होते, तेव्हा माझ्या काही मित्रांनी सांगितली की बॉबीसाठी राज कपूर नव्या मुलीच्या शोधात आहेत. मी त्या ऑडिशनला गेले पण मला नकार मिळाला कारण सांगण्यात आलं की मी चिंटू ऋषी कपूरपेक्षा मोठी दिसते. त्या काळात मी डायरीत राम राम लिहायचे. पुढे काय झालं ते माहीत नाही. पण राज कपूर यांनी मला परत बोलवलं. पुढे सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या." ही आठवणही डिंपल यांनी सांगितली.