चित्रपटसृष्टीमध्ये चालू असलेल्या घडामोडींवर सातत्याने चर्चा होताना दिसते. कधी कलाकारांची, कधी चित्रपटांची तर कधी भूमिकांची चर्चा होत असलेली पाहायला मिळते. अनेकदा दाक्षिणात्य चित्रपट आणि हिंदी चित्रपट यांच्यात तुलनादेखील झालेली पाहायला मिळते. आता यावर दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यप( Anurag Kashyap)ने वक्तव्य केले आहे. "कथा सांगण्यापेक्षा कलाकाराच्या लोकप्रियतेवर लक्ष" बॉलीवूडचे अनेक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चालत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची घोडदौड उत्तम सुरू असल्याचे दिसते. आता अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर वक्तव्य केले आहे. बॉलीवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी का चांगले काम करत आहे, यावर त्याने भाष्य केले आहे. अनुराग कश्यपने 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत, फहाद फाजिलची मुख्य भूमिका असलेला 'आवेशम' या चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले आहे की, या सिनेमात तीन एन्फ्लुएन्सरला महत्त्वाच्या भूमिकेत घेताना निर्मात्यांनी संकोच केला नाही. बॉलीवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत फक्त लोकप्रिय चेहऱ्यांनाच, कलाकारांनाच संधी दिली जाते. कथा सांगण्यापेक्षा कलाकाराच्या लोकप्रियतेवर लक्ष दिले जाते. अनेकदा बॉलीवूड चित्रपट पुनरावृत्तीच्या सापळ्यात अडकलेले दिसतात. पण, जेव्हा चौकटीच्या बाहेर जाऊन एखादा चित्रपट बनवला जातो, तेव्हा खूप सुंदर चित्रपट निर्माण होतात. हेही वाचा: ‘बिग बॉस’च्या घरात सूरज चव्हाणला मिळणाऱ्या वागणुकीवरून ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्याची संतप्त पोस्ट, म्हणाला, “दोन्ही वेळेची भांडी…” गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला '12th फेल' (12th Fail) आणि यावर्षी प्रदर्शित झालेला 'लापता लेडीज' या चित्रपटांचे कौतुक करताना त्याने म्हटले आहे की, जेव्हा वास्तविक गोष्टी लोकांसमोर मांडता, त्यावेळी उत्तम चित्रपट बनवले जातात. याबरोबरच, 'किल' (Kill ) या चित्रपटाचे कौतुक करताना म्हटले आहे की, हा एक ॲक्शन चित्रपट आहे, मात्र स्वत:मध्येच एक वेगळा चित्रपट आहे. त्याने काम केलेल्या 'महाराजा' चित्रपटाविषयीदेखील सांगितले की, त्याच्या हिंसाचाराबद्दल बरीच टीका झाली; अशीच टीका 'किल' चित्रपटावरदेखील झाली होती. 'ह्युमन्स ऑफ सिनेमा'ला दिलेल्या एका मुलाखतीत अनुराग कश्यपने बॉलीवूडमध्ये चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींवर ज्या प्रकारे पैसे खर्च केले जातात, त्यावर टीका केली होती. दरम्यान, करोना महामारीनंतर चित्रपटांचे गणित बदलेले होते. एकीकडे बॉलीवूडचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले, तर दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. २०२३ मध्ये शाहरुख खानच्या 'पठाण', 'जवान' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. अनुराग कश्यपने नुकतेच विजय सेतुपतीची मुख्य भूमिका असलेला 'महाराजा' या चित्रपटात अभिनय केल्याचे पाहायला मिळाले आहे.