हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियाद्वारे विविध क्षेत्रातील दिग्गज लोकांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजनी सोशल मीडियावर सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली.
नुकतंच दिग्दर्शक फरहाद सामजी यानेसुद्धा सतीश कौशिक यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. फरहाद याने एक गीतकार म्हणून प्रवास सुरू केला होता आणि या प्रवासात सतीश कौशिक यांनी त्याची प्रचंड मदत केल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. आपल्या याच प्रवासाबद्दल फरहाद सामजीने खुलासा केला आहे.
आणखी वाचा : आली रे आली, ‘सिंघम अगेन’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली; चित्रपट तज्ञ तरण आदर्श यांचा मोठा खुलासा
फरहाद म्हणाला, “मी २२ वर्षांपूर्वी माझ्या करिअरला सुरुवात केली. मी लिहिलेलं पहिलं गाणं सलमान खाननी ऐकलं आणि मला ‘हम कीसीसे कम नहिं’ या चित्रपटातून ब्रेक मिळाला. त्यावेळी सतीश कौशिक हे सलमानबरोबरच बसले होते. त्यावेळी सतीश कौशिक ही पहिली व्यक्ती होती ज्यांनी माझं कौतुक केलं आणि मला आणखी उत्तम काम करण्यासाठी प्रेरणा दिली. त्या चित्रपटात सतीश कौशिकसुद्धा होते, मी त्यांच्यासाठी धमाल पात्रं लिहिली आहेत, ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या आमच्या चित्रपटात सतीश कौशिक यांचं फार उत्तम काम तुम्हाला पाहायला मिळेल.”
फरहाद सामजी आणि सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट यंदा ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे, यामध्ये सतीश कौशिक यांची छोटीशी भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. याबरोबरच फरहाद हा बहुचर्चित ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटावरही काम करत आहे.