Imtiaz Ali Praises Ranbir Kapoor acting skill : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय अर्थात रणबीर कपूर लवकरच ऐतिहासिक भूमिकेमध्ये झळकणार आहे. नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ हा महत्त्वाकांशी प्रोजेक्टमध्ये रणबीर प्रभू रामांची मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘रामायणा’चा टीझर रिलीज झाला असून यामधील रणबीरच्या लूकचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक झाले. दरम्यान, चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी रणबीरच्या अभिनयावर आणि प्रभू रामांच्या भूमिकेवर भाष्य केले आहे. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेसाठी तो योग्य असल्याचे इम्तियाज अली यांनी नमूद केले.

दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या दोन चित्रपटांमध्ये रणबीर कपूरने भूमिका साकारली होती. हे दोन्हीही चित्रपट हीट तर ठरले, पण त्याचबरोबर रणबीरच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. इम्तियाज अली यांच्या ‘रॉकस्टार’ आणि ‘तमाशा’ या चित्रपटांमध्ये रणबीरने काम केले होते. यानंतर आता इम्तियाज अली यांना रणबीरच्या अभिनय कौशल्य आणि क्षमतेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावर इम्तियाज यांनी रणबीर कोणतीही भूमिका सहज साकारू शकतो, असे कौतुक केले आहे.

नैसर्गिक अभिनय करणारा अस्सल कलाकार – इम्तियाज

इम्तियाज अली यांना रणबीरच्या अभिनय क्षमतेचा कधी अंदाज लावला होता का आणि ‘ॲनिमल’सारखा चित्रपट करणारा अभिनेता आता ‘रामायण’सारखा ऐतिहासिक चित्रपट करत आहे, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर इम्तियाज अली म्हणाले, “एक अभिनेता म्हणून रणबीर काहीही करू शकतो. त्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या पाहिजेत आणि जेव्हा तो अशा वेगवेगळ्या भूमिका करतो, तेव्हा तो प्रामाणिकपणे आणि पूर्ण एकरूप होऊन अभिनय करतो. तो नैसर्गिक अभिनय करणारा अस्सल कलाकार आहे. मला खात्री आहे की तो विविधांगी भूमिका उत्तमरित्या साकारेल.

‘हा’ प्रेक्षकांसाठी खास अनुभव

‘रामायण’ चित्रपटातील भूमिकेबाबत इम्तियाज अली म्हणाले की, रणबीर कपूर हा प्रभू श्रीरामांची भूमिका साकारत आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. कारण या पात्राला न्याय देण्याची आणि प्रभावी भूमिका साकारण्याची क्षमता रणबीर कपूरमध्ये आहे. रणबीरच्या जिवंत अभिनयातून प्रभू श्रीरामांना पाहणे हा प्रेक्षकांसाठी खास अनुभव असेल, असे वक्तव्य दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी केले आहे.

रामायण चित्रपटात स्टार कलाकार साकारणार भूमिका

रामायण हा दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा महत्त्वाकांक्षी पौराणिक चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीरामांची तर साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत झळकणार आहे. अभिनेता यश रावणाची भूमिका साकारणार असून सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच रवि दुबे हे लक्ष्मण आणि अरुण गोविल हे दशरथ यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा यांच्या प्राइम फोकस स्टुडिओकडून केली जात आहे. चित्रपटाचे VFX काम ऑस्कर विजेत्या DNEG कंपनीकडून केले जात आहे.