Priyadarshan big statement on Hera Pheri 3 : घोषणा झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरलेली ‘हेरा फेरी ३’ ही फ्रँचायझी आता कायमची गुंडाळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मूळ ‘हेरा फेरी’ चित्रपटाचे दिग्गज दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी या चित्रपटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. “मला वाटत नाही की ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट भविष्यात कधीही बनवला जाईल,” असं त्यांनी म्हटलंय. तसेच अक्षय कुमारची ऑफर असूनही ‘भागम भाग २’ दिग्दर्शित करण्यास त्यांनी थेट नकार दिला आहे.

‘हेरा फेरी ३’ चं दिग्दर्शन न करण्याचा निर्णय का घेतला? असं विचारल्यावर ते म्हणाले, “यात इतरही खूप समस्या आहेत. खूप जास्त अडचणी आहेत. त्याबद्दल बोलायचं झाल्यास खूप वेळ जाईल.” ‘हेरा फेरी ३’ कधीतरी बनवला जाईल असं तुम्हाला वाटतं का? असं विचारल्यावर प्रियदर्शन म्हणाले, “मला वाटत नाही की हा चित्रपट कधी बनवला जाईल.”

‘भागम भाग २’च्या दिग्दर्शनास प्रियदर्शन यांनी दिला नकार

‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना, मूळ ‘हेरा फेरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या प्रियदर्शन यांनी, अक्षय कुमारची ‘भागम भाग २’ दिग्दर्शित करण्याची ऑफर का नाकारली? यावरही भाष्य केलं. “म्हणूनच मी कधीही सिक्वेल करत नाही, कारण तुम्ही दुसरा भाग बनवत असाल तर तो पहिल्या भागापेक्षा चांगला असला पाहिजे. जसं ‘टर्मिनेटर’ फ्रँचायझीच्या बाबतीत झालं, त्यांच्या पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग उत्तम होता. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे खूप चांगली कथा नसते, तोपर्यंत तुम्ही दुसरा भाग बनवू नये. लोक नेहमी पहिला चित्रपट यशस्वी झाल्यावरच सिक्वेल बनवतात, त्यामुळे जर तुम्ही त्यात सुधारणा करू शकला नाही, तर त्या फ्रँचायझीला काहीच किंमत उरत नाही.”

“कौतुकाला गालबोट का लावायचं?” प्रियदर्शन यांचं वक्तव्य

प्रियदर्शन पुढे म्हणाले, “सिक्वेलच्या बाबतीत असं असतं की ते पहिल्या चित्रपटाच्या नावावर गोष्टी विकत असतात. ते चित्रपट बनवत नाहीत, तर एखादा प्रोजेक्ट बनवत असतात आणि मला अशा प्रोजेक्ट्समध्ये रस नाही. ‘भागम भाग’च्या बाबतीतही, अक्षयने मला विचारलं होतं, ‘तुम्हाला दिग्दर्शन करण्यात रस आहे का?’ मी नाही म्हटलं. पण खरा प्रश्न असा आहे की, जेव्हा तुम्ही एखादा चित्रपट बनवता आणि लोकांना तो आवडतो, त्याचं कौतुक होतं तेव्हा दुसरा भाग बनवून त्या कौतुकाला गालबोट का लावायचं? म्हणूनच मी सिक्वेलचं दिग्दर्शन करण्यास नकार देतो. इतरांना माझ्या चित्रपटांचे सिक्वेल बनवायचे असतील तर माझी हरकत नाही.”

प्रियदर्शन यांनी जुलै महिन्यात ‘हेरा फेरी ३’ चे दिग्दर्शन करणार नसल्याचं जाहीर केलं. “सध्या माझा ‘हेरा फेरी ३’शी कोणताही संबंध नाही. माझ्या माहितीनुसार, अनेक कायदेशीर अडचणी आणि वैयक्तिक मतभेदांमुळे ‘हेरा फेरी ३’ कधीच प्रदर्शित होणार नाही,” असं त्यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितलं होतं.