Rohit Shetty New Car : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये गाड्या हवेत उडतानाचे दृश्य हमखास पाहायला मिळते. सिनेमातल्या दृश्यांमध्ये गाड्या उडवणं ही त्याच्यासाठी अगदी साधी गोष्ट आहे. त्याला गाड्यांची खूपच आवड आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आणि लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे. अशातच आता त्याने आणखी एक नवीन कार खरेदी केली आहे.
सिनेमातील अॅक्शन आणि स्टंट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या रोहित शेट्टीची ही नवी कार त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी साजेशी आहे. रोहित शेट्टीची ही इलेक्ट्रिक एसयूव्ही कार त्याच्या कार कलेक्शनमधील आतापर्यंतच्या सर्वांत महागड्या गाड्यांपैकी एक आहे.
रोहित शेट्टीने GMC Hummer EV ही आलिशान इलेक्ट्रिक एसयूव्ही कार खरेदी केली आहे. भारतात या कारची किंमत सुमारे ४.५७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे रोहित शेट्टी हा बॉलीवूडमधील सर्वांत महागड्या गाड्या असलेल्या सेलिब्रिटींपैकी एक ठरला आहे.
रोहितकडे याआधी Ford Mustang, Range Rover Sport, Mercedes-Benz AMG G63 व Lamborghini Urus यांसारख्या काही अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत ८० लाखांपासून ३.५ कोटी रुपयांपर्यंत आहे. रोहित शेट्टी अनेकदा त्याच्या कार्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. अशातच त्याचा GMC Hummer EV मधून जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
दरम्यान, रोहित शेट्टीबद्दल सांगायचं झालं तर, त्याचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट ‘सिंघम अगेन’ होता. सध्या तो मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या जीवनावर आधारित एका चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम आयपीएस राकेश मारिया यांची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे.

