Bollywood Director Shakeel Noorani Arrested: बॉलीवूडमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट ‘जोरू का गुलाम’ आणि ‘बडे दिलवाला’चा ७३ वर्षीय दिग्दर्शक शकील नूरानीला ३३ वर्षीय नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार, अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महाबळेश्वर येथील फार्महाऊसमधून अटक केली आहे.

पीडित अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनुसार, नूरानीने मागील चार वर्षे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकंच नाही तर तिला विषही दिलं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. अभिनेत्रीने केलेल्या दाव्यानुसार, नूरानीने एका आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्टवर चर्चा करण्याच्या बहाण्याने तिला मुंबईतील मालवणी भागातील त्याच्या घरी बोलावलं होतं. नंतर तिला गुंगीचं औषध मिसळून पेय प्यायला दिलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. शुद्धीवर आल्यावर नूरानीने तिला त्याच्या मोबाईलमध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि तिने पोलिसांत तक्रार केल्यास किंवा कुटुंबाला सांगितल्यास तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

यानंतर, या व्हिडीओची भीती दाखवून नूरानीने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. बलात्कारानंतर तो तिला गर्भनिरोधक गोळ्या द्यायचा. एकदा तर त्याने तिला विषही दिलं, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला, अशी माहिती ४० दिवसांपूर्वी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

नूरानीला महाबळेश्वरमधून अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर नूरानी फरार झाला होता. पोलिसांनी मुंबईतील अंधेरी येथील लोखंडवाला भागातील त्याच्या मुलाच्या घरावरही छापा टाकला, पण तो सापडला नाही. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी महाबळेश्वर येथील फार्महाऊसमधून त्याला अटक केली.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर शकील नूरानीला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्याला न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बडे दिलवाला, जोरू का गुलाम, विष्णू देवा, श्रीमान आशिकी, तेजाब या चित्रपटांसाठी शकील नूरानी ओखळला जातो.