Sunny Deol and Sunil Darshan Dispute: बॉलीवूडमधील एकेकाळची सुपरहिट दिग्दर्शक आणि अभिनेता जोडी आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. ‘लुटेरे’ आणि ‘इन्तेकाम’ सारखे चित्रपट देणाऱ्या सुनील दर्शन यांनी सनी देओलबद्दल अत्यंत टोकाचं विधान केलं आहे. सुनील दर्शन म्हणाले की, सनी देओल हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय आहे. सनीने माझ्याकडून पैसे घेतले, पण चित्रपट कधीच बनवला नाही आणि भावनांचा गैरफायदा घेतला, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, ज्या ‘जानवर’ चित्रपटामुळे अक्षय कुमारचे करिअर सावरले, त्या चित्रपटात आधी सनी देओल झळकणार होता, मात्र वादामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

बॉलीवूडमध्ये काही दिग्दर्शक व अभिनेत्याच्या जोड्यांनी मिळून खूप हिट चित्रपट दिले. यामध्ये डेव्हिड धवन व गोविंदा, सुनील दर्शन व अक्षय कुमार, सुनील दर्शन व सनी देओल यांचाही समावेश आहे. मात्र, काही कारणांनी सुनील दर्शन व सनी देओल यांच्यात मतभेद झाले. ते इतके विकोपाला पोहोचले की त्यांनी सनी देओल हा आपल्या आयुष्यातील सर्वात काळा अध्याय आहे, असं वक्तव्य केलं.

सनी देओलने आपल्याकडून पैसे घेतले, पण तो चित्रपट मात्र कधीच बनू शकला नाही, असं सुनील दर्शन यांनी सांगितलं. सनी देओलबरोबर कायदेशीर वाद असलेल्या सुनील दर्शन यांनी बॉबी देओलबरोबर काम केलं असून त्यांचे चांगले संबंध आहेत. सनीबरोबर काम करणं म्हणजे एखाद्या लहान मुलाबरोबर काम करण्यासारखं आहे, असं स्पष्ट मत सुनील यांनी विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. सनी ‘जानवर’ चित्रपटात झळकणार होता, पण सुनीलबरोबर वाद झाल्याने त्या चित्रपटात नंतर अक्षय कुमारने काम केलं.

सनी देओल आयुष्यातील काळा अध्याय – सुनील दर्शन

सुनील दर्शन यांच्या मनात सनी देओलबद्दल नाराजी आहे आणि ती त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवते. “सनी देओल माझ्या आयुष्यातील आणि करिअरमधील सर्वात काळा अध्याय आहे, पण देव आहे, तो सगळं बघतोय, तो न्याय करेल,” असं सुनील दर्शन यांनी म्हटलं.

Suneel Darshan Sunny Deol Akshay Kumar Controversy News Loksatta Marathi
दिग्दर्शक सुनील दर्शन व सनी देओल (फोटो- इन्स्टाग्राम)

सनी देओलबद्दलच्या वाईट गोष्टी शब्दांत सांगू शकत नाही

सुनील यांनी सनी देओलबरोबरच्या वादाचं कारण सांगितलं. “ते खूप शक्तीशाली लोक आहेत आणि त्यांना कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. पण मला खात्री आहे की या सगळ्यांचा न्याय कधीतरी होईलच. काही गोष्टी इतक्या वाईट आहेत, ज्या मी शब्दांत सांगू शकत नाही. मी सनीबरोबर तीन चित्रपट केले. मी माझा पहिला चित्रपट ‘इंतेकाम’मध्ये त्याला घेतलं, खरं तर तेव्हा तो मोठा स्टार नव्हता. मी त्याच्या बऱ्याच चित्रपटांचं वितरणही केलं होतं. ज्या चित्रपटातून सनीला लाँच करण्यात आलं, त्यातही माझं मोठं योगदान होतं,” अशी आठवण सुनील दर्शन यांनी सांगितली.

सनी देओलबरोबर काम करणं महागात पडलं – सुनील दर्शन

“मी त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण मला वाटलं की चित्रपटसृष्टीला त्याच्यासारख्या लोकांची गरज आहे. इंतेकाम सिनेमा करताना मी थोडा गोंधळलो होतो. पण ‘लूटेरे’ हा दुसरा चित्रपट करताना मला त्याच्या वागण्यात फरक जाणवला. पण तिसऱ्यांदा जेव्हा एकत्र काम करत होतो तेव्हा काहीतरी गडबड नक्कीच आहे, याची मला खात्री पटली. प्रॉडक्शनदरम्यान मला वाईट अनुभव आले. मला तो खूप महागात पडला. त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे एखाद्या लहान मुलाचे लाड पुरवून काम करून घेण्यासारखं होतं. मला त्याच्याबरोबर चौथा चित्रपट करायचाच नव्हता, पण मी अडकलो होतो. त्याने माझ्या भावनांचा वापर केला, खोट्या गोष्टी सांगितल्या आणि तो स्वतःसाठी करत असलेल्या एका प्रोजेक्टमध्ये त्याने मला सामील करून घेतलं,” असं सुनील दर्शन यांनी सांगितलं.

अक्षय कुमारबद्दल सुनील दर्शन काय म्हणाले?

अक्षय कुमार व सुनील दर्शन यांची जोडी एकेकाळी खूप लोकप्रिय होती. त्यांनी एकत्र तब्बल सात चित्रपट केले, त्यातले बरेच हिट ठरले. मात्र त्यांच्यातही काही कारणाने मतभेद झाले आणि मग दुरावा आला. दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही. सुनील दर्शन यांनी अक्षय कुमारबरोबर मतभेद असले तरी त्याच्या अभिनयाचं, गुणांचं मात्र कौतुक केलं. /“अक्षय कुमार अजिबात वाईट माणूस नाही. त्याला खूप बदनाम करण्यात आलंय. तो गुणी आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं.