Disha Patani rent out Mumbai luxury flat : मुंबईतील घरांच्या किमती आणि भाडे नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. विशेषतः सेलिब्रिटींच्या आलिशान घरांबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकाला घर विकत घेणे शक्य नसल्याने मुंबईमध्ये घरे भाडेतत्त्वावर देणे हा एक मोठा बिझनेस झाला आहे. त्यामधून अनेक बॉलीवूड कलाकार हे स्वतःच्या लक्झरी प्रॉपर्टीमधून दरमहा लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. आता या यादीत अभिनेत्री दिशा पाटनी हिचेही नाव जोडले गेले आहे. दिशाने तिचे मुंबईतील आलिशान घर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आकारले जाणारे दर महिन्याचे भाडे ऐकून सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री दिशा पाटनी हिचा मुंबईतील खार वेस्ट भागामध्ये आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने देण्याचा निर्णय तिने घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील अत्यंत तेजीत असलेल्या भाड्याच्या घरांच्या बिझनेसमधून लाखोंचे उत्पन्न मिळवणाऱ्या बॉलीवूड कलाकारांच्या यादीत आता दिशाचाही समावेश झाला आहे. ‘झॅपकी’ (Zapkey)द्वारे मिळालेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, दिशा पाटनी हिने ‘रुस्तमजी पॅरामाउंट’ (Rustomjee Paramount) मधील तिचा फ्लॅट भाड्याने दिला आहे. १ जून २०२६ रोजी नोंदणीकृत झालेला हा ‘लीव्ह-अँड-लायसन्स’ करार दोन वर्षांसाठी करण्यात आला आहे.
दरमहा किती मिळणार भाडे?
अभिनेत्री दिशा पाटनी हिने कमलाबेन मंगलभाई गुज्जर यांना घर भाड्याने दिले आहे. १,००० चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमान असलेल्या या फ्लॅटचे प्रतिमहिना भाडे लाखो रुपये असणार आहे. घराचे भाडे ऐकून सर्वांना धक्का बसला आहे. भाडे करारांतर्गत दिशा पाटनी हिच्या घराचे दरमहा भाडे २.८५ लाख रुपये असणार आहे. त्यासह या घरासाठी भाडेकरूने तीन महिन्यांचे भाडे अर्थात ८.५५ लाख रुपये अनामत स्वरूपात दिले आहे.
या करारामध्ये पहिल्या वर्षानंतर ५% भाडेवाढीचाही समावेश आहे. त्याचा अर्थ असा की, दुसऱ्या वर्षी भाडे दरमहा सुमारे २.९९ लाख रुपयांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे हा लक्झरी फ्लॅट भाड्याने दिल्याने दिशा पाटनी ही लाखो रुपया्ंची कमाई करू शकणार आहे.
सलमान, शाहरुखसह सेलिब्रिटी घर देतात भाड्याने
दोन वर्षांच्या कालावधीत दिशा पाटनी या घराच्या व्यवहारामधून ७१ लाख रुपयांहून अधिक पैसे कमावणार आहे. मुंबईतील फ्लॅट भाड्याने देणारी दिशा ही काही एकमेव सेलिब्रिटी नाही. यापूर्वी सलमान खान, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन व अमिताभ बच्चन यांसारख्या सेलिब्रिटींनीही अलीकडच्या काळात मुंबईतील निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देऊन महिन्याला लाखो रुपयांची कमाई केली आहे. त्यामधून त्यांना मिळणारे उत्पन्न हा चर्चेचा विषय ठरला आहे.
‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटामध्ये झळकणार दिशा
अभिनेत्री दिशा पाटनी ही तिच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘वेलकम’ फ्रँचायजीच्या तिसऱ्या चित्रपटामध्ये दिशा प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. अक्षय कुमारसह ती या चित्रपटामध्ये झळकणार असून, तिच्या या नवीन चित्रपटासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. बहुप्रतीक्षित ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपट २६ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचा भव्य ट्रेलर रिलीज इव्हेंट पार पडला आहे.
